कराडमध्ये आज महिला स्वयंरोजगार व उद्योग मेळावा

कराड/प्रतिनिधी : –
अखिल भारतीय मराठा महासंघ आणि शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महिला स्वयंरोजगार व उद्योग मेळावा आज मंगळवार, दि. 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता कराड अर्बन बँक हेड ऑफिसच्या शताब्दी हॉलमध्ये पार पडणार असून, महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि उद्यमशीलतेकडे वाटचाल करण्यासाठी हा मेळावा प्रेरणादायी ठरणार आहे.
या मेळाव्याचा उद्देश महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करणे, लघुउद्योग व गृहउद्योगांची माहिती देणे आणि आर्थिक स्वावलंबनाचे महत्त्व पटवून देणे असा आहे. सहभागी महिलांना उद्योग सुरु करण्यासाठी आवश्यक तांत्रिक प्रशिक्षण, मार्केटिंगचे मार्गदर्शन, तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती या मेळाव्यात दिली जाणार आहे.
कराड शहरातील ‘जिजाऊ सर्व्हिसेस’ या संस्थेकडून महिलांसाठी घरबसल्या लघुउद्योग सुरू करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचा प्रमुख उपक्रम म्हणजे Buy Back Agreement, ज्यामध्ये महिलांनी तयार केलेला माल संस्था स्वतः परत खरेदी करते. त्यामुळे विक्री किंवा बाजारपेठेचा त्रास न होता महिलांना घरबसल्या नियमित उत्पन्न मिळू शकते. संस्थेकडून पूर्णपणे भारतीय मशिनद्वारे उत्पादन, मालवाहतूक सुविधा, मशीन मेंटेनन्स आणि प्रशिक्षणासाठी शंभर टक्के मार्गदर्शन, तसेच सर्वाधिक मोबदल्याचे बायबॅक अॅग्रीमेंट अशा सुविधा दिल्या जातात. सध्या चालू असलेल्या प्रकल्पांमध्ये फुल्ली ऑटोमॅटिक कपूर मेकिंग प्रोजेक्ट आणि साबराणी धूप कप प्रोजेक्ट यांचा समावेश असून, या माध्यमातून महिलांना प्रती किलो ३० ते ५० रुपये मजुरी मिळते.
‘जिजाऊ सक्सेस’ आणि ‘भारत ई-सेवा केंद्र’ या संस्थाही स्वावलंबनासाठी नवे मार्ग उपलब्ध करून देत आहेत. या केंद्रांद्वारे नागरिकांना बँकिंग सेवा, सरकारी योजना, पॅन, पासपोर्ट, विमा, आरटीओ, पेन्शन, जॉब कार्ड, हेल्थ कार्ड आणि मोबाइल रिचार्जसारख्या ऑनलाइन सुविधा एका ठिकाणी मिळतात. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना सोयीस्कर सेवा मिळण्याबरोबरच इच्छुकांना स्वतःचा रोजगार निर्माण करण्याची संधीही उपलब्ध होते.
महिलांना व युवकांना सेंद्रिय शेती उत्पादन, अन्न व दुग्ध प्रक्रिया, ग्रामीण लघु व कुटीर उद्योग, फॅब्रिकेशन आणि हस्तकला उत्पादन या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देण्याची योजना संस्थेकडून राबवली जाणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना मिळेल आणि स्वावलंबनाचा दीप प्रज्वलित होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
“स्वावलंबन हा खरा सशक्तीकरणाचा मार्ग आहे. आपल्या कौशल्यांचा वापर करून घरबसल्या आर्थिक स्वावलंबन साधता येऊ शकते, आणि या उपक्रमांमुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला मोठा चालना मिळणार आहे,” असे संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले.



