ज्येष्ठ नेते आणि समाजसेवक जयसिंगराव पाटील यांचे निधन; परिसरात शोककळा

कराड / प्रतिनिधी :-
रयत सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व माजी मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांचे जेष्ठ बंधू जयसिंगराव बाळकृष्ण पाटील (बापू )वय ९५ यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या निधनाने उंडाळे परिसरावर शोककाळा पसरली असून येथील व्यापाऱ्यांनी ऐन दिवाळीत सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जयसिंगराव पाटील यांचा जन्म १० ऑक्टोबर १९३१ साली उंडाळे येथे झाला १९५२ मध्ये ते उंडाळे गावचे पहिले सरपंच झाले तर तालुक्यातील शेती उत्पन्न बाजार समिती कराड तालुका देखरेख संघ कराड पाटण तालुका सुपरवायझिंग युनियन गजानन हाउसिंग सोसायटी या संस्थांवर ही त्यांनी काम केले. डोंगरी भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी १९६६ मध्ये स्थापन झालेल्या ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्षपदी त्यांनी दीर्घकाळ पार पाडले त्यांच्या काळामध्ये संस्थेचा मोठ्या प्रमाणावर शाखा विस्तार झाला . पुढे डोंगरी भागात रयत सहकारी साखर कारखाना उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता रयत कारखान्याचे चेअरमन पदही त्यांनी दीर्घकाळ सांभाळले उंडा ळे विभागातील ते एक चालते बोलते लोकन्यायालय होते विभागातील कोणतेही तंटे ते पोलीस स्टेशन बाहेरच मिटवत त्यामुळे त्यांचा विभागात दरारा होता त्यांना शासनाचा दलित मित्र पुरस्कार दिल्लीचा राष्ट्रीय रत्न पुरस्कार विजय दिवस समारोह कराडचा जीवनगौरव पुरस्कार यासह विविध पुरस्कार मिळाले होते भारदस्त आवाज उत्तम वक्तृत्व आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर डोंगरी विभागातील स्थानिक प्रश्न बंधू विलासराव पाटील उंडाळकर यांच्या माध्यमातून सोडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता प्रचंड लोक संग्रह व विभागाची जाण असणारा नेता म्हणून ते विभागात ओळखले जात होते. लोकनेते स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांच्या राजकीय जीवनात ते त्यांच्या पाठीशी सावलीप्रमाणे उभे राहिले जयसिंगराव पाटील यांचा 10 ऑक्टोबर 2025 रोजी 95 वा वाढदिवस संपन्न झाला यावेळी त्यांनी आपल्या आप्तेष्ट व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा ही स्वीकारल्या होत्या. दहाच दिवसापूर्वी शुभेच्छा दिलेल्या नेत्याला आज निरोप देण्याची वेळ आल्याने कार्यकर्त्यांना शोक अनावर झाला होता त्यांच्या पश्चा त चिरंजीव व ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे चेअरमन अँड. आनंदराव पाटील (राजाभाऊ), पुतणे रयत साखर कारखान्याचे चेअरमन अँड. उदयसिंह पाटील उंडाळकर, हायकोर्ट चे वकील अँड. विजयसिंह पाटील, दोन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे .