ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस

कराड/प्रतिनिधी : –
सातारा जिल्ह्यातील सर्वात ज्येष्ठ पत्रकार शंकरराव सखाराम पाटील यांचा आज सोमवारी (दि. २०) ९० वा वाढदिवस असून, तो घरगुती पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे.
शंकरराव पाटील तथा बापू यांनी आपल्या अगदी उमेदीच्या काळात पत्रकारितेस प्रारंभ केला. शोधक पत्रकारिता अन् खास वार्तापत्र ही त्यांच्या लेखनाची खासियत असून, त्यांच्या अनेक कव्हर स्टोरीज १९८० च्या दशकात गाजल्या आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, कॉम्रेड व्ही. एन. पाटील, आर. के. करंजिया, ग. गो. जाधव, हरिभाऊ निंबाळकर, नीलकंठ खाडिलकर, यांच्याशी त्यांचा स्नेह होता. पत्रकारांच्या अनेक चळवळीत त्यांनी योगदान देताना, आपल्या सात दशकांच्या पत्रकारितेत आखिल भारतीय पत्रकार परिषदेच्या स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवरील जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वी सांभाळल्या. विशेष म्हणजे त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी यासह अनेक भाषांमधून निघणाऱ्या ब्लिट्झ, फ्री प्रेस जर्नल अशा बहुभाषिक राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय साखळी वृत्तपत्र समुहात प्रभावी पत्रकारिता केली. त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक स. ब. पाटील यांची ब्रिटीश काळात अलंकार व शिक्षकांचा कैवारी ही वृत्तपत्रे होती. योगायोगाने पुढे शंकरराव पाटील यांनी वडिलांचा वारसा पुढे चालवत आयुष्यभर पत्रकारिता केली. दै. पुढारीचे ते विशेष प्रतिनिधी राहिले आहेत. मराठा, शिदोरी, रथचक्र, प्रभात, नवाकाळ, नवशक्ती, तरुण भारत, ग्रामोध्दार, नवसंदेश, महासत्ता, सागर, सह्याद्री एक्सप्रेस इत्यादी वृत्तपत्रासाठी लेखन केले आहे.