कराड बाजार समितीतर्फे शेतमाल तारण कर्ज योजना सुरू
कराड/प्रतिनिधी : –
दिवाळीचा सण आणि रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची आर्थिक गरज ओळखून, कराड कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतमाल तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालावर किमान आधारभूत किंमतीच्या ७५ टक्क्यांपर्यंत कर्ज १८० दिवसांसाठी फक्त ६ टक्के व्याजदराने दिले जाणार आहे.
सभापती शंकरराव (सतिश) इंगवले आणि उपसभापती संभाजी काकडे यांनी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी संचालक प्रकाश पाटील, विजयकुमार कदम, जयंतीलाल पटेल, नितीन ढापरे, तसेच प्रभारी सचिव ए.आर. पाटील उपस्थित होते.
मका, हळद, सोयाबीन, भात, तुर, मूग, उडीद या पिकांसाठी तारण कर्ज दिले जाणार असून, शेतकऱ्यांनी संबंधित अटी व शर्तींचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या सोयाबीन, भात, मूग, उडीद या पिकांची काढणी सुरू आहे. या पिकांची खरेदी-विक्री करताना आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने विक्री करू नये, असे निर्देश बाजार समितीने दिले आहेत.
सोयाबीन खरेदीबाबत व्यापाऱ्यांची बैठक समितीच्या कार्यालयात घेण्यात आली. यावेळी व्यापाऱ्यांनी आधारभूत किंमतीप्रमाणेच खरेदी करावी, असे आदेश उपनिबंधक सहकारी संस्था, कराड यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
भविष्यात शासनाकडून शेतमाल विक्रीपश्चात अनुदान मिळवण्यासाठी बाजार समितीतील अधिकृत शेतकरी पट्टी आवश्यक असते. त्यामुळे शेतमाल विक्रीनंतर शेतकऱ्यांनी शेतकरी पट्टी मागून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बाजार समिती कायदा व नियमांचे पालन न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. परवाना नसताना खरेदी-विक्री केल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई होणार आहे. तसेच शेतमालाचे वजन व आर्द्रता मोजणी प्रमाणित साधनांवरच करावे, असे स्पष्ट करण्यात आले. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीसाठी भांडवल उभे करावे, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.