सातारा जिल्हाहोम

सुगंधा हिरेमठ यांचा गौरीशंकर कल्याणी यांच्यावर बनावट कागदपत्रे व फसवणुकीचा आरोप 

कराड पोलिसांकडे धाव 

कराड/प्रतिनिधी : – 

उद्योगपती पद्मभूषण डॉ. नीळकंठ कल्याणी यांच्या कन्या सुगंधा हिरेमठ यांनी आपल्या धाकट्या भावाविरुद्ध गौरीशंकर कल्याणी, त्यांच्या पत्नी रोहिणी कल्याणी आणि माजी कर्मचारी प्रकाश होनराव यांच्याविरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि कौटुंबिक मालमत्ता बेकायदेशीररीत्या हस्तांतरित केल्याची तक्रार कराड पोलिसांकडे दाखल केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू आहे.

सुगंधा हिरेमठ गेल्या काही वर्षांपासून आपल्या वडिलोपार्जित संपत्तीतील हक्कासाठी न्यायालयीन लढा देत आहेत. ही संपत्ती सुमारे ६० हजार कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जाते. त्यांचे दोन्ही भाऊ उद्योगपती बाबा कल्याणी आणि गौरीशंकर कल्याणी यांनी संपूर्ण मालमत्ता ताब्यात घेतल्याचा त्यांचा आरोप आहे.

अलीकडेच सुगंधा हिरेमठ यांना समजले की, कराडमधील दोन प्रमुख मालमत्ता 2008 मध्ये बनावट पॉवर ऑफ अटर्नीद्वारे गौरीशंकर कल्याणी आणि त्यांच्या पत्नीच्या नावे हस्तांतरित करण्यात आल्या. या व्यवहारासाठी वापरलेली पावर ऑफ अटर्नी त्यांच्या वडिलांकडून बनावटरीत्या तयार करण्यात आली होती, असा आरोप त्यांनी केला आहे.

मूळतः ही पावर ऑफ अटर्नी डॉ. नीळकंठ कल्याणी यांनी आजारी असताना फक्त मालमत्तेच्या देखरेखीकरिता दिली होती. मात्र, त्यात नंतर मालमत्ता हस्तांतर करण्याचा अधिकार जोडण्यात आल्याचे सुगंधा यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या दस्तऐवजाचा वापर करून प्रकाश होनराव यांच्या माध्यमातून दोन मालमत्ता कल्याणी दाम्पत्याच्या नावे हस्तांतरित झाल्या.

डॉ. कल्याणी यांना फसवणुकीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी 2009 मध्ये पावर ऑफ अटर्नी रद्द केली, परंतु तोपर्यंत मालमत्ता त्यांच्या ताब्यात गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी कराड न्यायालयात दोन खटले दाखल केले. हे खटले अद्याप न्यायप्रविष्ट आहेत.

या सर्व घडामोडींनंतर सुगंधा हिरेमठ यांनी संबंधित पुरावे सादर करून कराड पोलीस अधीक्षकांकडे नवी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची छाननी सुरू केली असून, लवकरच आरोपींकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.

Related Articles