सहकारातील आदर्शवत कारखाना म्हणून कृष्णा साखर कारखान्याचा नावलौकिक – नीलिमा गायकवाड

कराड/प्रतिनिधी : –
कृष्णा कारखाना शेतकऱ्यांचे हित केंद्रबिंदू मानून उत्कृष्टपणे वाटचाल करत आहे. सहकारातील एक आदर्शवत कारखाना म्हणून कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा नावलौकिक आहे. असे प्रतिपादन पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक श्रीमती नीलिमा गायकवाड यांनी केले.
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित पुणे व प्रादेशिक सहसंचालक साखर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्यातील पदाधिकारी व विभाग प्रमुख यांच्यासाठी जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन डॉ. सुरेश भोसले होते.
यावेळी पुणे येथील महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे, विभागीय समन्वयक अरुण काकडे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, कोल्हापूर येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे सहकार अधिकारी डॉ.एम. ए. मुरूडकर, सनदी लेखापाल धीरज देशपांडे, निलेश निकम, श्रीधर कोल्हापूरे, डॉ.राजन पडवळ, कारखान्याचे सर्व संचालक, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी.एन देशपांडे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार उपस्थित होते.
नीलिमा गायकवाड म्हणाल्या, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शक कारभार आणि शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून विविध शेतकरी कल्याणकारी उपक्रम राबवून कृष्णा कारखान्याने राज्यातील सहकार क्षेत्रात आपली विशिष्ट ओळख निर्माण केली आहे. कारखान्याच्या पदाधिकारी व विभागप्रमुख यांना अधिक प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ कारखान्याच्या पुढील वाटचालीसाठी निश्चितच होईल.
चेअरमन डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ग्रामीण जीवन सहकारावर अवलंबून आहे. स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने सहकाराला चालना मिळाली. सहकार आपल्या देशाला पुढे घेऊन जाऊ शकतो. सहकारात काम करताना प्रशिक्षण महत्वाचे आहे. त्या दृष्टीने हे एकदिवसीय प्रशिक्षण स्तुत्य उपक्रम आहे. मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी स्वागत केले. अरुण काकडे यांनी प्रास्ताविक केले. सेक्रेटरी सिध्देश्वर शिलवंत यांनी सूत्रसंचालन केले. मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी आभार मानले.
या विषयांवर मार्गदर्शन
एकदिवसीय प्रशिक्षणात सायबर सिक्युरिटी, डिजिटल फ्रॉड, डिजिटल अरेस्ट व विविध अँपचा वापर करताना घ्यावयाची दक्षता या विषयावर धीरज देशपांडे, महसुली दप्तराबाबत माहिती व 97 वी घटना दुरुस्ती साखर कारखान्याचे पदाधिकारी संचालक यांची भूमिका व जबाबदारी या विषयावर डॉ. एम.ए. मुरुडकर, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना या विषयावर निलेश निकम, वैधानिक लेखापरीक्षण ठळक तरतुदी, विशेष अहवाल दोष दुरुस्ती अहवाल इ. या विषयावर श्रीधर कोल्हापुरे यांनी, व्यक्तिमत्व विकास व ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर डॉ.राजन पडवळ या मान्यवरांनी मार्गदर्शन केले.