सातारा जिल्हाहोम

बोगस मतदारप्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष – गणेश पवार यांचा आरोप

कराड/प्रतिनिधी : –

कापिल (ता. कराड) येथे रहिवासी नसलेल्या लोकांनी कापिल गावच्या पत्त्यावर बनावट आधारकार्ड तयार करून गावातच मतदार नोंदणी करून मतदान केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या बोगस मतदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी तहसील कार्यालयासमोर गेल्या सात दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र, प्रशासनाने या गंभीर प्रकाराची अद्याप या आंदोलनाची दखल घेतली नसून, बोगस मतदारांवर गुन्हे दाखल करण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ कराड असल्याचा आरोप उपोषणकर्ते गणेश पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.

यासंदर्भात बोलताना पवार म्हणाले, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कराड यांनी संबंधित मतदारांची पूर्वीच्या ठिकाणांची नावे कमी न करता कोणत्या कायद्याखाली कापिल येथे नावे वाढवली, याची सखोल चौकशी व्हावी.

तसेच कराड शहर पोलिसांनी दिलेल्या पत्रात बनावट कागदपत्र देऊन निवडणूक प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या मतदारांविरुद्ध तक्रार दाखल झाल्यासच गुन्हा दाखल करता येईल, असे नमूद केले आहे. मात्र, ज्यांना हरकत आहे, त्यांनीच गुन्हा दाखल करावा, असे प्रांताधिकारी सांगत आहेत या परस्परविरोधी भूमिका घेऊन निवडणूक अधिकारी दिशाभूल करत असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.

तसेच बोगस मतदारांविरोधात पुरावे सादर करूनही निवडणूक प्रशासन गुन्हा दाखल करण्याबाबत टाळाटाळ करत आहे. त्यामुळे प्रशासनाची भूमिकाच संशयास्पद वाटते,” असा आरोपही पवार यांनी यावेळी केला.

दरम्यान, या आंदोलनाला काँग्रेससह विविध पक्ष आणि स्थानिक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवला असून, पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही पवार यांनी दिला आहे.

Related Articles