राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

कराड/प्रतिनिधी : –
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) संघटन मजबूत करण्यासाठी जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सुरू आहेत. त्यानुसार कराड दक्षिण मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करत आल्याचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी सांगितले.
येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत सोळसकर बोलत होते. यावेळी सादिक इनामदार, धनाजी काटकर, जितेंद्र डुबल आदी पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोळसकर यांनी, कराड दक्षिण तालुकाध्यक्षपदी सुधीर जगताप (वडगाव हवेली), महिला अध्यक्षपदी दिपाली जाधव, तर युवक अध्यक्षपदी महादेव शिंदे (कोळीवाडी) यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर केले. या नूतन पदाधिकाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच लवकरच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीनकाका पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येणार असून, त्यावेळी अन्य तालुकास्तरीय निवडी जाहीर केल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना सोळसकर म्हणाले, दिवंगत नेते विलासराव पाटील-वाठारकर यांच्या नेतृत्वाखाली कराड दक्षिणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत पकड होती. दरम्यानच्या काळात पक्षीय बदल आणि फेरबदलांमुळे ती शक्ती काहीशी कमी झाली होती. मात्र, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि उदयसिंह पाटील यांच्या प्रवेशामुळे आता पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एका प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, दोन्ही उंडाळकर बंधूंच्या सहकार्याने पक्ष अधिक मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कराड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी विजयसिंह यादव यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली असून, पुढील निर्णय उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले जातील, असे सोळसकर यांनी सांगितले.