कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

कराड/प्रतिनिधी : –
आपल्या जिवलग भावाच्या पुण्यस्मरण दिनी सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येत कराड येथील पवार कुटुंबाने माणुसकीचा एक आदर्श दाखवला आहे. सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीने शेकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले असताना, कै. विलास आप्पासाहेब पवार यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त हा स्मरणोत्सव साधेपणाने साजरा करून, त्यातून बचत झालेली रक्कम २१ हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अर्पण करण्यात आली.
ही रक्कम अविष्कार पवार यांचे वडील प्रकाश (नरेंद्र) पवार व विनायक पवार यांनी माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्द केली.
स्व. यशवंतराव चव्हाण आणि स्व.पी.डी. पाटील यांसारख्या थोर नेत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणाऱ्या या कुटुंबाने “आपत्तीच्या काळात मदत करणे, हीच खरी श्रद्धांजली” या विचाराने प्रेरित होऊन हा निर्णय घेतला.
कराड परिसरात पवार कुटुंबाच्या या उपक्रमाचे कौतुक होत असून, समाजात मानवतेचा संदेश देणारी ही घटना अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.