सातारा जिल्हाहोम

कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड

बँक लवकरच ६००० कोटींच्या व्यवसायाकडे; सक्षम नेतृत्वाची नवी पिढी कमान सांभाळणार

कराड/प्रतिनिधी : – 

दि. कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कराडच्या अध्यक्षपदी समीर सुभाषराव जोशी आणि उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा कार्यालयाचे संजयकुमार सुद्रिक यांनी अध्यासी अधिकारी म्हणून निवड प्रक्रिया पार पाडली.

नवनिर्वाचित अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या सत्कार समारंभात अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी म्हणाले, “सन २०२२ पासून बँकेच्या व्यवस्थापनात तरुण नेतृत्वाचा समावेश करण्याचे धोरण राबवले आहे. संचालक मंडळातील नव्या पिढीला जबाबदारी देणे हा त्या प्रयत्नांचा पुढचा टप्पा आहे. बँक लवकरच ६००० कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण करेल. बँकिंग क्षेत्रातील बदलांसोबत राहून भविष्यातील वाटचालीसाठी सक्षम नेतृत्व मिळणे ही आनंदाची बाब आहे.

व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी यांनी म्हणाले, संस्थेच्या विकासात सातत्याने बदल आवश्यक असतात. डॉ. सुभाष एरम यांनी दिलेले योगदान बँकेच्या इतिहासातील सुवर्णपान आहे. व्यवस्थापनातील हा बदल बँकेच्या भविष्यकाळाशी निगडीत असून, व्यवसायाच्या ऐतिहासिक टप्प्याकडे वाटचाल सुरू राहील.

नूतन अध्यक्ष समीर जोशी म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या या संस्थेची वाटचाल पारदर्शकता, राजकारणरहितता आणि निस्वार्थी कारभार या तत्त्वांवर झाली आहे. या परंपरेचे पालन करून सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने बँकेचा विकास कायम ठेवू.

उपाध्यक्ष शशांक पालकर यांनी, बँकेच्या संचालक मंडळाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या जनसंपर्क आणि व्यवस्थापन कौशल्याचा उपयोग करून व्यवसायवृद्धीला गती देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

सत्कार समारंभास सर्व संचालक, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे, सेवकवर्ग, सभासद व हितचिंतक उपस्थित होते.

नव्या नेतृत्वाकडून सक्षम वाटचालीची अपेक्षा

सहकारी क्षेत्रावर बँकींग रेग्युलेशन अॅक्ट आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमांमुळे सभासदांचे प्रतिनिधी म्हणून काम करताना जागरूकता आवश्यक आहे. २०२२ च्या निवडणुकीत १२ नवीन संचालकांना संधी देत तरुण नेतृत्व विकसित करण्याचा प्रयत्न झाला. त्या सातत्याचा भाग म्हणूनच सर्व संचालकांनी समीर जोशी आणि शशांक पालकर यांची बिनविरोध निवड केली असल्याचे बँकेचे माझे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी सांगितले.

बँकेच्या वाटचालीत एरम कुटुंबाचे योगदान अमूल्य आहे. नवीन नेतृत्व बँकेला अधिक सक्षमतेकडे नेईल, याचा मला विश्वास आहे.

– डॉ. सुभाष एरम, (माजी अध्यक्ष, कराड अर्बन बँक)

 

Related Articles