गटस्तरीय खुल्या महिला भजनी स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र, इस्लामपूरच्या महिला भजनी संघ प्रथम

इस्लामपूर/प्रतिनिधी : –
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सांगली येथे आयोजित गटस्तरीय खुल्या महिला भजनी स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र, इस्लामपूरच्या महिला भजनी संघाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या संघाची राज्यस्तरीय स्पर्धेस निवड झाली आहे.
इस्लामपूर केंद्राच्या स्वाती पंडीत यांना उत्कृष्ट पेटीवादक म्हणून सन्मानित करण्यात आले. इस्लामपूर केंद्राचे संचालक पियुष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संघाने हा विजय मिळविला आहे.
या स्पर्धेत सांगली व सातारा जिल्ह्यातील सांगली, सातारा, कराड, इस्लामपूर, मांजर्डे, माडगुळे, कुंडल व तासगांव अशा आठ निमंत्रित महिला भजनी संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत इस्लामपूर केंद्राने पहिला क्रमांक,मांजर्डे केंद्राने दुसरा क्रमांक, तर कुंडल केंद्राने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. या स्पर्धेचे परीक्षण संगीत विशारद भक्ती साळुंखे, सुरेश विभुते, संदीप वाडेकर यांनी केले.
माजी महापौर सौ. संगीता खोत, जेष्ठ कीर्तनकार व प्रवचनकार सौ.संध्या काने- लेले, सांगली येथील इरळे उद्योग समूहाच्या संचालिका सौ.सुप्रिया इरळे यांच्या हस्ते विजेत्या संघांना व व्यक्तींना बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले. गट सांगलीचे कामगार कल्याण अधिकारी अरुण लाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी या स्पर्धेचे अतिशय उत्कृष्ठ नियोजन केले आहे.
इस्लामपूर केंद्राच्या संघात स्वाती पंडीत, वैशाली शिंदे, कांचन क्षिरसागर, पुष्पलता जगताप,वैशाली जाधव, गीतांजली देसाई, पद्मजा जाधव, अनिता जाधव, गीतांजली मोहिते, प्रतिभा यादव, सुनंदा बसरगी यांचा सहभाग होता. आनंदराव शिंदे यांनी तबला साथ केली आहे. गणेश कुंभार, आक्काताई डांगे यांनी संयोजन केले.



