सातारा जिल्हाहोम

मत चोरीविरोधात जिल्हा काँग्रेस रस्त्यावर उतरणार – रणजितसिंह देशमुख

गणेश पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर

कराड/प्रतिनिधी : –

मतदार यादीतील बोगस नावे आणि मत चोरीच्या प्रकरणांवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. केंद्र व राज्यात मत चोरीच्या माध्यमातून सत्तेत आलेल्या सरकारचा पर्दाफाश खासदार राहुल गांधी देशभर करत असताना, कराड तालुक्यातील कापिल येथील गणेश पवार यांनी याच मुद्यावर आवाज उठवला आहे. त्यांच्या आंदोलनाला सातारा जिल्हा काँग्रेसने ठाम पाठिंबा देत, लवकरच रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिला.

कापिल येथे बाहेरगावच्या नऊ जणांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड तयार करून मतदार यादीत नावे नोंदवली आणि विधानसभा निवडणुकीत मतदानही केले. या प्रकरणाची सर्व पुरावे सादर करून तक्रार दिल्यानंतरही निवडणूक प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याने गणेश पवार यांनी मागील दोन दिवसांपासून प्रशासकीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. गुरुवारी रणजितसिंह देशमुख यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन, पवार यांच्या आंदोलनाला सातारा जिल्हा काँग्रेसचा अधिकृत पाठिंबा जाहीर केला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, अजितराव पाटील-चिखलीकर, इंद्रजित चव्हाण, प्रदीप जाधव, संजय तडाखे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, मत चोरीच्या माध्यमातून सत्तेवर आलेले हे सरकार लोकशाहीसाठी धोका आहे. राहुल गांधी देशपातळीवर या अन्यायाविरोधात लढत आहेत. राज्यातही जनता विधानसभा निवडणुकीतील मत चोरी विसरलेली नाही. गणेश पवार यांनी पुराव्यासह तक्रार करूनही प्रशासन कारवाई करत नाही, ही लोकशाहीची थट्टा आहे. त्यामुळे काँग्रेस आता या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेणार असून, 12 तारखेपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल.

अजित पाटील-चिखलीकर यांनीही अधिकाऱ्यांवर टीका करताना, शेतकऱ्यांपासून ते मतदारांपर्यंत फसवणूक करणाऱ्या या सरकारविरोधात काँग्रेस न्यायासाठीचा निर्धार घेऊन लढणार आहे. मत चोरीविरोधातील हे आंदोलन म्हणजे लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न असल्याचे संगितले.

Related Articles