सातारा जिल्हाहोम

डॉ. अंजनी शाह यांना कालिकादेवी पतसंस्थेचा महिला शक्ती गौरव पुरस्कार जाहीर

कराड/प्रतिनिधी : –

श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सुरु करण्यात आलेला स्व.सौ. वेणूताई चव्हाण महिला शक्ती गौरव पुरस्कार 2024-25 हा पहिला पुरस्कार कराडच्या समाजसेविका डॉ. अंजनी अनिल शहा यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती पुरस्कार समितीचे निमंत्रक प्रा. अशोककुमार चव्हाण, श्री कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान (सावकार) आणि चेअरमन राजन वेळापुरे यांनी दिली.

यावेळी ज्येष्ठ संचालक अरुण जाधव, डॉ. संतोष मोहिरे, संस्थापक संजीव मोहिरे व कार्यलक्षी संचालक विवेक वेळापुरे उपस्थित होते.

श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने समाजसेवा, शिक्षण, साहित्य, सहकार आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गेली १२ वर्षे यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्याची परंपरा सुरू आहे. या परंपरेला नवा आयाम देत संस्थेने स्व.सौ. वेणूताई चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्व.सौ. वेणूताई चव्हाण महिला शक्ती गौरव पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्वातंत्र्य लढ्यात स्व. सौ. वेणूताई चव्हाण यांनी खंबीर पाठीशी राहून साथ दिली. ब्रिटिश पोलिसांच्या मारहाणीमुळे त्यांना शारीरिक त्रास सहन करावा लागला, तुरुंगवास भोगावा लागला, तरीही त्यांची निष्ठा आणि धैर्य अबाधित राहिले. त्यांचे कार्य महाराष्ट्रातील आणि देशातील महिलांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरले आहे. या कार्याचा जागर सतत समाजात व्हावा, ही संस्थेची भूमिका असल्याचे आयोजकांनी सांगितले.

उंब्रजचे स्वातंत्र्यसैनिक डॉ. माणेकलाल गुलाबचंद शाह यांच्या स्नुशा व स्व. भाऊसाहेब शाह यांच्या कन्या असलेल्या डॉ.सौ. अंजनी शाह यांनी जवळपास दोन दशके भारतातील वनवासी समाजाच्या विकासासाठी काम केले आहे. कोल्हापुरच्या वनवासी कल्याण आश्रमासोबत त्यांनी सामाजिक उत्थान आणि शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रुपये एक लाख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शनिवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता सौ. वेणूताई चव्हाण सभागृह, कराड येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.

समारंभाचे अध्यक्षस्थान माजी खासदार व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील भूषवणार असून, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील प्रमुख पाहुणे असतील. विशेष अतिथी म्हणून आ. डॉ. अतुल भोसले, इंद्रजीत देशमुख, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles