पै. कालिचरण सोपनकरने दाखवले पै.राहुल सुळला आस्मान
साखराळेत श्री. भैरवनाथ व बिरोबा यात्रेनिमित्त जंगी कुस्ती मैदान उत्साहात

इस्लामपूर/प्रतिनिधी : –
साखराळे (ता.वाळवा) येथे श्री.भैरवनाथ व बिरोबा यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीमध्ये कोल्हापूर येथील गंगावेश तालमीचा मल्ल पै.कालिचरण सोपनकर याने पुणे येथील हनुमान आखाड्याचा मल्ल पै.राहुल सुळ याच्यावर पाय घिस्सा डावावर प्रेक्षणीय विजय मिळविला.
साखराळे ग्रामपंचायत, आणि श्री.भैरवनाथ व बिरोबा यात्रा समितीच्या वतीने या मैदानाचे उत्कृष्ठ आयोजन करण्यात आले. या मैदानात दीडशेच्यावर चटकदार कुस्त्या झाल्या. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, तनिष्का फौंडेशन (महाराष्ट्र राज्य)चे अध्यक्ष अनिल जाहीर प्रामुख्याने उपस्थित होते.
दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये बामणी (सोलापूर) चा मल्ल पै. परमेश्वर गाडे याने सांगलीच्या भोसले व्यायामशाळेचा मल्ल पै. दत्ता खोत यास एकचाक डावावर चितपट केले. राजारामबापू कुस्ती केंद्राचा मल्ल पै. समीर पठाण याने भोसले व्यायाम शाळेचा भारत यमगर याला, तर राजारामबापू कुस्ती केंद्राचा मल्ल पै. सत्यजित पाटील याने हनुमान आखाड्याचा मल्ल पै. आप्पा लोमटे याला चितपट केले. साखराळेचा पै. धैर्यशील धनाजी पाटील याने कलाजंग डावावर प्रतिस्पर्धी मल्लास अस्मान दाखविले.
विराज कचरे, रघु चव्हाण वारणानगरमाउली कोकरे वारणानगर, आर्यन माळी (क्रांती), ज्ञानदीप जाधव चिंचणी यांच्यासह अनेक मल्लांनी चटकदार कुस्त्या करून कुस्ती प्रेमींच्या डोळ्याचे पारणे फेडले. पै. विकास पाटील, विठ्ठल माळी, मेहबूब शेख, विठ्ठल नाईक, राजाभाऊ घाटगे, संदीप बंडगर, दिनकर बाबर यांनी पंच म्हणून काम पाहिले.
पोलीस निरीक्षक संजय हारुगडे, माजी सरपंच बाबूराव पाटील, भास्करराव पाटील, अविनाश पाटील, आनंदराव दवणे, पी.बी. सुर्वे, वसंतराव माने, मोहन लोहार, राजाराम बापू कुस्ती केंद्राचे प्रशिक्षक कुंडलिक गायकवाड, नितीन सलगर, सुनिल मोहिते (क्रांती), गुलाबराव पाटील, विजयराव पाटील (नागठाणे), दत्ताजी आंदळकर, संपतराव जाधव, संभाजी जाधव, दिनकर शिंदे, बंडामामा रेठरेकर, राजेंद्र गावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सरपंच सुजाता डांगे, उपसरपंच सचिन पाटील, टी.के. पाटील, बाबासो डांगे, विनोद बाबर, रामराजे पाटील, हणमंत पाटील यांच्यासह ग्रामपंचायत व समितीच्या कार्यकर्त्यांनी मैदानाचे आयोजन केले. विशाल आवळे यांच्या हलगीचा ठेका आणि सुरेश माने, अभिजित मानेयांच्या ओघवत्या सूत्रसंचलनाने कुस्ती मैदानाची रंगत वाढत गेली.