कृष्णा नदीकाठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाखांचा निधी

कराड/प्रतिनिधी : –
कराड शहरातील रुक्मिणीनगर परिसरात कृष्णा नदीच्या काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी महायुती सरकारने तब्बल १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून मंजूर झालेल्या या निधीमुळे, पुरामुळे त्रस्त होणाऱ्या रुक्मिणीनगर भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कृष्णा नदीला गेल्या काळात आलेल्या पुरामुळे कृष्णा पुलाच्या खालील कराड शहराकडील बाजूची मोठ्या प्रमाणावर धूप होऊन, नदीतीरावरील घरांची पडझड झाली होती. तसेच नदीच्या उजव्या तीरावर विशेषत: रुक्मिणीनगर परिसरात नागरी वस्ती व धार्मिक स्थळांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे या परिसरात संरक्षण भिंत उभारण्याची मागणी नागरिकांमधून होत होती. दरम्यान, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनीही या भागात पूरसंरक्षक भिंतीच्या उभारणीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्याकडे केली होती.
या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन आ.डॉ. भोसले यांनी भागातील नागरी वस्तीला धोका निर्माण होऊ नये, यासाठी याठिकाणी तातडीने पूरसंरक्षक भिंत उभारण्यासाठी निधी मंजूर करावा, अशी आग्रही मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली. आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे रुक्मिणीनगर भागात कृष्णा नदीच्या काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी महायुती सरकारने तब्बल १६ कोटी ९२ लाख रुपयांच्या निधीला आज मंजुरी दिली.
या निधीतून रुक्मिणीनगर येथे कृष्णा पूलाच्या खालील बाजूस कृष्णा नदीच्या उजव्या काठावर सा.क्र. २५ ते सा.क्र. ६५० मीटर लांबीची पूरसंरक्षक भिंत उभारली जाणार आहे. या पूरसंरक्षक भिंतीचे बांधकाम महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून केले जाणार आहे. पूरसंरक्षक भिंतीच्या बांधकामामुळे नदीच्या प्रवाहात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देशही जलसंपदा विभागाने दिले आहेत. तसेच बांधकाम पूर्ण झाल्यानंतर भिंतीच्या देखभालीची जबाबदारी कराड नगरपरिषदेकडे सोपविली जाणार आहे.
महायुती सरकारच्या या निधी मंजुरीमुळे रुक्मिणीनगर परिसरातील पूरप्रवण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कृष्णा नदीकाठच्या वाढत्या वस्तीच्या संरक्षणासाठी ही पूरसंरक्षण भिंत महत्वाची ठरणार आहे. शासनाने हा भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल या भागातील नागरिकांमधून महायुती सरकार व आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आभार व्यक्त केले जात आहेत.