सातारा जिल्हाहोम

गणेश पवार यांचे धरणे आंदोलन सुरु

कराड/प्रतिनिधी : –

कापिल, ता. कराड गावात प्रत्यक्षात न राहणाऱ्या काही लोकांनी बनावट आधारकार्ड तयार करून गावाच्या पत्त्यावर मतदार म्हणून नोंदणी केली असून, त्यांनी मतदानही केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या गैरप्रकारात सहभागी सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी प्रशासकीय कार्यालयासमोर धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे.

तसेच, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कराड यांनी या मतदारांची पूर्वीची नावे कमी न करता कापिल गावात नोंदणी कोणत्या कायद्याखाली केली, याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, तसेच संजय गांधी योजनेचे अव्वल कारकून युवराज पाटील यांनी कोणताही अधिकृत आदेश नसताना निवडणूक शाखेत चुकीचे काम केल्याचा आरोप करत, त्यांना तात्काळ निलंबित करून खातेनिहाय चौकशी करावी, अशीही मागणी पवार यांनी केली आहे.

दरम्यान, कापिल गावात प्रत्यक्षात न राहणाऱ्या काही लोकांनी बनावट आधारकार्ड तयार करून मतदान केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई व्हावी, यासाठी पवार यांनी यापूर्वी नऊ दिवस उपोषण केले होते. त्यांनतर आता बोगस मात्दारांसह या प्रक्रियेत दोषी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी त्यांनी पुन्हा धरणे आंदोलन सुरु केले आहे. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांनी दोषींवर योग्य ती कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही पवार यांनी दिला आहे.

Related Articles