कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण

कराड/प्रतिनिधी : –
कराड मर्चंटसहकारी क्रेडिट सोसायटी मर्या., कराड यांच्यावतीने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर एकूण ४८ वाहनांचे वितरण करण्यात आले. यात ९ चारचाकी, ३५ दुचाकी, ३ तीनचाकी आणि एका ट्रॅक्टरचा समावेश आहे. संस्थेचा वाहन कर्जावरील कमी व्याजदर आणि शासनाने वाहनावरील जी.एस.टी.मधील कपात यामुळे वाहन तारण कर्ज योजनेस चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन माणिकराव पाटील यांनी दिली.
यावेळी बोलताना चेअरमन माणिकराव पाटील यांनी, संस्थेचे कुटुंबप्रमुख सत्यनारायण मिणीयार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने आजपर्यंत ९०० कोटी रुपयांचा व्यवसाय पूर्ण केला असून, चालू आर्थिक वर्षांत १००० कोटींचा टप्पा गाठण्याचा मानस असल्याचे सांगितले.
तसेच आधुनिक काळातील स्पर्धात्मक वातावरणात संस्था ग्राहकांना विविध अत्याधुनिक सुविधा पुरवत आहे. QR कोडद्वारे व्यवहार सुविधा तसेच “संस्था आपल्या दारात” या अभिनव उपक्रमाला खातेदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच गरीब, शेतकरी व उद्योजक वर्गाला कमी व्याजदरात कर्जसुविधा, तरुणांसाठी विशेष कर्ज योजना सुरू केल्या असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी वारुंजी शाखा समिती सदस्य म्हणून नियुक्तीबद्दल अधिकराव पवार व अनिकेत केंजळे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला संचालक राहुल मिणीयार, भास्करराव पाटील, आकाश जाधव, सौ. अरुणा चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक माटेकर, बाजीराव यादव, शाखा समिती सदस्य, सभासद व सेवक खातेदार उपस्थित होते.