कृष्णा विद्यापीठाचा पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅडस्च्या वापराला प्रोत्साहन देण्याचा निर्धार

कराड/प्रतिनिधी : –
प्लास्टिकयुक्त डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड्सच्या वापरामुळे पर्यावरण आणि महिलांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होत आहे. यावर पर्याय म्हणून पुनर्वापर करता येणाऱ्या आरोग्यदायी व पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅडस्च्या वापराला प्रोत्साहन देण्याचा आणि याबाबत महिलांमध्ये व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार कृष्णा विश्व विद्यापीठ आणि सौख्यम फाऊंडेशने केला आहे.
कृष्णा विश्व विद्यापीठात सौख्यम फाउंडेशनच्या सहकार्याने ‘मासिक पाळीसाठी आरोग्यदायी, स्वच्छतापूर्ण व पर्यावरणपूरक अशी पुनर्वापर करता येणारी उत्पादने’ या विषयावर नुकतेच चर्चासत्र घेण्यात आले. कृष्णा महिला सहकारी औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा, संशोधन संचालिका (नि. ब्रिगेडियर) डॉ. हिमाश्री, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. युगांतरा कदम, नर्सिंगच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, सौख्यम् फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. अंजू बिष्ट, कम्युनिटी मेडिसीन विद्याशाखेच्या डॉ. वसुंधरा घोरपडे उपस्थित होत्या.
या चर्चासत्रात पर्यावरणपूरक व आरोग्यदायी पुनर्वापर करता येणाऱ्या मासिक पाळीतील उत्पादनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना सौ. उत्तरा भोसले म्हणाल्या, की महिलांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीचे महत्व रुजविण्यासाठी कृष्णा विश्व विद्यापीठ व सौख्यम फाऊंडेशने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणाबरोबरच महिलांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत होईल.
डॉ. अंजु बिष्ट म्हणाल्या, सॅनिटरी पॅड महिलांच्या स्वच्छतेसाठी आवश्यक असले, तरीही बाजारातील बहुतेक डिस्पोजेबल पॅडमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि रासायनिक घटक असतात. अशा उत्पादनांच्या वापरामुळे पर्यावरणात न मिसळणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण वाढत असून, मानवी आरोग्यावरही विपरित परिणाम होत आहे. भारतात प्रतिवर्षी अब्जावधी टन सॅनिटरी नॅपकिन वापरले जात असून, याचे लाखो टन कचऱ्यामध्ये रूपांतर होत आहे. प्लास्टिकयुक्त डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड्सच्या दीर्घकालीन संपर्कामुळे प्रजनन आरोग्य, हॉर्मोनल असंतुलन, अलर्जी किंवा त्वचेच्या संवेदनशीलतेवर परिणाम होतो. अशावेळी डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड्सऐवजी पुनर्वापर करता येणाऱ्या पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅडस्च्या वापराबाबत महिलांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे.
डॉ. हिमाश्री यांनी उपस्थितांना महिलांच्या आरोग्याचे संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि पुनर्वापरयोग्य उत्पादनांच्या प्रसाराची शपथ दिली. शाश्वत भविष्यासाठी व स्वत:चे आरोग्य जपण्यासाठी पुनर्वापर करता येणारी मासिक पाळीची उत्पादने स्वीकारण्याची, तसेच या उत्पादनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याची शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली. तसेच महिलांचे आरोग्य, पर्यावरणाचे रक्षण आणि शाश्वत भविष्यासाठी काम करण्याचा सामूहिक संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाला प्राध्यापक, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.