सातारा जिल्हाहोम

उरुण इस्लामपुरात घुमणार “फोक आख्यान”चा आवाज

दसरा लोककला महोत्सवाचे प्रतिकदादा पाटील यांच्या पुढाकारातून आयोजन

इस्लामपूर/प्रतिनिधी : – 

केवळ भारत देश नव्हे, तर संपूर्ण जगभरातील मराठी रसिक प्रेक्षकांना आपल्या उर्जा संपन्न कलाकृतीच्या माध्यमातून भूरळ घालणाऱ्या सुप्रसिध्द “फोक आख्यान”चा आवाज, दसरा लोककला महोत्सवाच्या निमित्ताने आता उरुण इस्लामपूर शहरात घुमणार आहे. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या पुढाकारातून मंगळवार दि.९ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता उरूण इस्लामपूर येथील मा. जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात हा कार्यक्रम संपन्न होत आहे.

यावेळी माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्याशी “दिलखुलास गप्पा”कार्यक्रम ही होणार आहे. या कार्यक्रमाचा प्रवेश सर्वांच्यासाठी खुला आहे. महिलांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

फोक आख्यानच्या टीमने छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा,संतांचे अभंग-भारूडं,ज्योतिबा,खंडोबा,म्हसोबा यासारख्या जागृत देवस्थानांचे वर्णन आपल्या पहाडी आवाजातून केले आहे. तसेच या ऊर्जास्रोतांवर असलेली सामान्य माणसांची श्रद्धा आपल्या शब्दात मांडली आहे. या अनोख्या उर्जा,शक्ती आणि संस्कृतीचे संगम उरूण-इस्लामपूर शहरासह तालुक्यातील कला रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

यापूर्वी विविध सणांच्या निमित्ताने विविध नाच-गाण्यांचे कार्यक्रम पश्चिम महाराष्ट्रात होऊन गेले. पण पारंपरिक वाद्यांच्या गजरात तल्लीन करणारा हा कार्यक्रम पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्रात होत आहे. काळाच्या ओघात हरवून जाणारी महाराष्ट्राची लोक कला,लोकसंस्कृती टिकविण्यासाठी आणि आपला खरा इतिहास,परंपरा आणि संस्कृती तरुणांपर्यंत पोचविण्यासाठी प्रतिकदादा पाटील यांनी एक वेगळे पाऊल टाकले आहे.

या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचा आनंद आणि आस्वाद वाळवा तालुक्यातील कला रसिकांनी घ्यावा,असे आवाहन प्रतिकदादा पाटील यांनी केला आहे.

पुण्या-मुंबईला रु.पंधराशे प्रवेश फी।।

पुण्या-मुंबईसह संपूर्ण देशात आणि देशाबाहेर “फोक आख्यान”जोरात गाजत आहे. पुण्या-मुबईला रु.पंधराशेने तिकीट विक्री झाली आहे. मात्र युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या प्रयत्नाने उरूण इस्लामपूर येथील कार्यक्रम सर्वांच्यासाठी खुला,मोफत ठेवण्यात आला आहे. लोककला, लोक संस्कृती जपण्याचा,ती नव्या पिढीकडे नेण्या चा हा एक प्रयत्न असल्याचे संयोजकांनी सांगितले.

Related Articles