सातारा जिल्हाहोम

बोगस मतदारप्रकरणी प्रांताधिकारी व अव्वल कारकून दोषी – गणेश पवार यांचा आरोप 

कारवाईची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

कराड/प्रतिनिधी : –

कापिल (ता. कराड) येथील विधानसभा निवडणुकीत परगावातील नऊ जणांनी बोगस मतदान केल्याचे प्रकरण उघड झाल्यानंतरही प्रशासनाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनाच जबाबदार ठरवले आहे.

यासंदर्भात कराडचे मतदान नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे आणि संजय गांधी योजनेचे अव्वल कारकून युवराज पाटील यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, तसेच संबंधित बोगस मतदारांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आठ ऑक्टोबरपासून प्रशासकीय कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही पवार यांनी दिला आहे.

कापिल गावातील बोगस मतदान प्रकरण व प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची माहिती देण्यासाठी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य नितीन ढापरे उपस्थित होते.

पवार म्हणाले, कापिल गावचे मतदार नसतानाही परगावातील नऊ जणांनी विधानसभा निवडणुकीत मतदान केले. यासंदर्भात तक्रार करूनही कराडच्या निवडणूक विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आम्हाला नऊ दिवसांचे उपोषण करावे लागले. त्यानंतर प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिले, पण आजतागायत ठोस पावले उचललेली नाहीत.

प्रांताधिकाऱ्यांनी या नऊ जणांची शहानिशा करून त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याचे आदेश दिले असले, तरी संबंधितांना वाचवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून प्रशासनच त्यांना पाठीशी घालत आहे. या बनावट कागदपत्रांमध्ये भाडेकरार व नोटरी दस्तऐवजांमध्ये गंभीर त्रुटी असूनही, निवडणूक विभागाने ती स्वीकृत केली आहेत, असा आरोप पवार यांनी केला. तसेच आम्ही यापूर्वी फक्त त्या बोगस मतदारांवर कारवाईची मागणी केली होती, मात्र आता या प्रकरणात निवडणूक नोंदणी अधिकारी आणि अव्वल कारकून दोघेही थेट दोषी असल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच युवराज पाटील यांची नियुक्ती संजय गांधी योजनेत असूनही, ते आठ वर्षांपासून निवडणूक विभागाचे काम पाहत असल्याकडे लक्ष वेधत, त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणीही पवार यांनी केली आहे. पुढील टप्प्यात बनावट कागदपत्र तयार करणाऱ्यांविरोधात स्वतंत्र कारवाई आणि आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कापिल गावातील विधानसभा निवडणुकीत परगावच्या नऊ जणांनी बोगस मतदान केल्याच्या प्रकरणात प्रशासनातीलच अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत गणेश पवार यांनी प्रांताधिकारी व अव्वल कारकुनावर कारवाईचा ठणका लावला आहे.

Related Articles