सातारा जिल्हाहोम

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण

कराड/प्रतिनिधी : –

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या दसरा सणाच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतर्फे विविध ग्राहकांना वाहनकर्जाचे वितरण करण्यात आले. बँकेमार्फत एकूण १५ कोटी रुपयांचे वाहनकर्ज देण्यात आले असून त्यापैकी ५ कोटी रुपयांचे वितरण केवळ कराड विभागातून झाले आहे.

कराड शहरातील वाहनांचे पूजन व वितरण हे श्री. समीर जोशी, डॉ. अनिल लाहोटी, संचालक मंडळाचे सदस्य, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपमहाव्यवस्थापक अतुल शिंदे, विजय पाटील, शाखाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

बँकेचे ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी आणि डॉ. सुभाष एरम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहकाभिमुख धोरण राबवून बँकेने घरगुती वाहनांसाठी ८.५०% आणि व्यावसायिक वाहनांसाठी ९% व्याजदराची योजना उपलब्ध करून दिली आहे. या योजनांना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. शिंगटे यांनी सांगितले की, नुकत्याच संपलेल्या अर्धवर्षाअखेरीस बँकेचा व्यवसाय ५९०० कोटी रुपयांवर पोहोचला असून नेट एनपीए शून्य टक्के ठेवण्यात बँकेने यश मिळवले आहे. हे यश संचालकांचे मार्गदर्शन आणि सेवकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे शक्य झाले, असे त्यांनी नमूद केले.

ग्राहकांना केवळ आर्थिक पतपुरवठा न करता आर्थिक शिस्त आणि सल्लाही देत असल्याने कराड अर्बन बँकेबद्दल ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles