सातारा जिल्हाहोम

जमियत उलमा ए हिंद व खिदमत-ए-खलक, सातारा संस्थांचा परांडा तालुक्यातील पुरबाधितांना मदतीचा हात

परांडा/प्रतिनिधी : –

दसऱ्याच्या शुभप्रसंगी सातारकरांनी दाखविलेल्या माणुसकीच्या दर्शनामुळे पूरग्रस्त मराठवाड्यातील अनेक बांधवांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. “वोह हम मे से नहीं जो खुद पेटभर खाये और उसका पडोसी भूखा सोये” या पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीला प्रत्यक्ष कृतीत आणत जमियत उलमा ए हिंद व खिदमत-ए-खलक सातारा संस्थांनी परांडा तालुक्यातील पुरबाधितांना मदतीचा हात दिला.

सिना आणि खैरी नदी परिसरात आलेल्या महापुरामुळे शेकडो कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले. घर, शेत, संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या. तात्पुरत्या कॅम्पमध्ये राहताना अन्नधान्याचा व वस्तूंचा तुटवडा भासू लागला. अशा परिस्थितीत सातारकरांनी “आपला सण म्हणजेच त्यांचा आनंद” या भावनेतून पुढाकार घेतला.

दि. २ ऑक्टोबर रोजी दसरा सणानिमित्त चिंचपूर बु, शेलगाव, मुनशी तसेच आवटी (जि. सोलापूर) येथील बांधवांना राशन किट, कपडे, शालेय साहित्य, औषध किट व कम्युनिटी किचनचे साहित्य पोहोचवण्यात आले. आजवर सातारा जिल्ह्यातून तब्बल १००० कुटुंबांना मदतीचा हात पोहोचविण्यात आला आहे.

यासाठी जमियतचे परांडा अध्यक्ष मुर्तुझा पठाण, पत्रकार निलोफर शेख, इरफान शेख, समीर पठाण आदींनी गावागावात जाऊन प्रशासन व स्थानिक पडताळणीसह गरजूंनी यादी तयार केली. महाराष्ट्र राज्याध्यक्ष मौलाना नदीम सिद्दीकी यांच्या मार्गदर्शनाखाली “एक हात माणुसकीचा” हा उपक्रम राबविला जात आहे.

स्थानिक समाजबांधव शिवाजी शिंदे, रिजवान शेख, जानकीराम गायकवाड, दत्ता कोष्टी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पूरग्रस्त कॅम्पमध्ये प्रत्यक्ष जाऊन भांडी, कपडे, शालेय साहित्य व आवश्यक वस्तूंचे वाटप केले. या प्रसंगी जमियतचे तसेच खिदमत ए खलक, सैफुल्लाह ग्रुप, मी मुस्लिम मावळा छत्रपतींचे स्वयंसेवक, स्थानिक कार्यकर्ते व समाजातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles