श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय – चेअरमन राजन वेळापुरे

कराड/प्रतिनिधी : –
श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेला ३८ वर्षांची उज्वल परंपरा आहे. या आर्थिक वर्षात ३ कोटी २१ लाख रुपये नफा झाला असून, सभासदांना संस्था सातत्याने ३१ वर्षांच्या परंपरेनुसार १५ टक्के लाभांश जाहीर केला आहे. संस्थेने कराड व सातारा शाखेच्या माध्यमातून २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय करुन प्रगतीचे पुढचे पाऊल टाकले आहे. संस्थेने निव्वळ NPA चे प्रमाण शुन्य टक्के राखण्यात यश मिळविले आहे. तसेच कर्जथकबाकीही अत्यंत अल्प प्रमाणात आहे. संस्थेने स्थापनेपासून ‘अ’ वर्ग मिळवण्याची परंपरा चालू ठेवली आहे, असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन राजन वेळापुरे यांनी केले.
शहरातील कृष्णाबाई मंगल कार्यालयात संस्थेच्या ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी श्री कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान-सावकार, सहकारी पतसंस्था तालुका फेडरेशनचे संचालक कृष्णत पाचुपते, डॉ. संतोष मोहिरे, अरुण जाधव, व्हा. चेअरमन अनिल सोनवणे, प्रा. अशोक चव्हाण, निरंजन मोहिरे, कार्यलक्षी संचालक विवेक वेळापुरे व संचालक व्यासपीठावर उपस्थित होते.
चेअरमन वेळापुरे म्हणाले, संस्थेच्या ३७ वर्षांच्या वाटचालीमध्ये माजी नगराध्यक्ष स्व. जयवंतराव जाधव, संस्थापक चेअरमन स्व. गजानन उर्फ बाळासाहेब मोहिरे, स्व. जयंतीलाल भंडारी, स्व. महेश त्रिभुवणे यांनी प्रारंभीच्या काळात मोठे योगदान दिले आहे. संस्थेच्या स्थापनेपासुन मुनीर बागवान-सावकार, विवेक वेळापुरे यांनी संस्थेच्या प्रगतीचा वेग कायम राखण्यासाठी व संस्था अर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सातत्याने परिश्रम घेतले आहेत.
संस्थेच्या कराड शहराच्या मुख्य बाजारपेठेत व सातारा येथे राजपथ कमानी हौदासमोर, गुरुवार पेठ सातारा येथे स्वमालकीच्या अत्याधुनिक वास्तू आहेत. यामध्ये लॉकर सुविधा, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांच्या माध्यमातून ई-पेमेंटद्वारे स्टॅम्प फी, रजिस्टर फी, GST, इंन्कमटॅक्स, व्हॅट, टी.डी.एस., DHC, सर्च फी अशा सुविधांच्या बरोबर RTGS/ NEFT शासकीय व ट्रेझरी चलने या सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत. संस्था सभासदांना विविध सेवा सुविधा नेट बँकिंगच्या माध्यमातून देऊन ‘बँकिंग सेवेची मालिका श्री कालिका’ हे ब्रिद वाक्य पुर्ण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेच्या प्रारंभी प्रा. अशोक चव्हाण यांनी प्रास्ताविक करुन दिवंगतांना आदरांजली वाहिली. राजेंद्रकुमार यादव, अरुण जाधव, शरदचंद्र देसाई, मुनीर बागवान-सावकार, सौ. सीमा विभुते यांनी विषय पत्रिकेप्रमाणे सुचना सभेसमोर मांडल्या. जयाराणी जाधव यांनी आभार मानले. सभेस सीए शिरिष गोडबोले, संगणक सल्लागार राजेंद्रकुमार साठे, संस्थापक संजय मोहिरे, संचालक सुरेश भंडारी, डॉ. जयवंत सातपुते, सुरेश कोळेकर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.