सातारा जिल्हाहोम

कृष्णा कारखान्यात मोठ्या योजना कार्यान्वित करण्याचा मानस – डॉ. सुरेश भोसले

वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात, लिफ्ट इरिगेशन योजनांसाठी मोठा निधी आणणार - आ.डॉ. अतुल भोसले 

कराड/प्रतिनिधी : –
जुन्या कृष्णा कारखान्याचे मोठ्या प्रमाणात विस्तारकाम (इक्सपान्शन) केल्याने गाळप क्षमता वाढली असून, त्यामुळे कारखान्याची आर्थिक बचत झाली आहे. कामाचे दिवस कमी झाले असले, तरी कामगारांना अधिक दिवस रोजगार देण्यात आला आहे. येत्या काळात कामगारांना सातत्याने रोजगार मिळावा, यासाठी मोठ्या योजना कार्यान्वित करण्याचा मानस असल्याचे कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले.
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ६९ व्या सर्वसाधारण सभेत कारखान्याच्या माजी संचालक मंडळाच्या कारभारावर अप्रत्यक्ष निशाणा साधताना ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. अतुल भोसले, व्हा. चेअरमन जगदिश जगताप, माजी आमदार भगवान साळुंखे, संचालक वसंतराव शिंदे, धोंडीराम जाधव, बाजीराव निकम, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर चारूदत्त देशपांडे प्रमुख उपस्थित होते.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, कृष्णा कारखान्यातील पारदर्शक कामकाजामुळे कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पुरस्कार मिळाले आहेत. ही आपल्या सर्वांच्या कामाची पोचपावती आहे. परंतु, कृष्णा सहकारी साखर कारखान्यात ज्यांनी जे काही दिवे लावले, त्यांचे हिशोब नक्की होतील”, असा इशारा डॉ. सुरेश भोसले यांनी दिला.
यावेळी कारखान्याच्या मागील संचालक मंडळाच्या कारभारात कामगारांच्या नावाखाली दरवर्षी १८ ते २० कोटी रुपयांची उधळपट्टी झाली, त्यांचा मस्टरवर नामोल्लेखही नव्हता, असा आरोप त्यांनी केला. याचबरोबर डिस्लरीमध्ये “महाराष्ट्र मेड लिकर” अर्थात विदेशी मद्य निर्मिती करण्याची योजना असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
आमदार डॉ. अतुल भोसले म्हणाले, शेतकऱ्यांच्या लिफ्ट इरिगेशन योजनांना आर्थिक पाठबळ मिळवण्यासाठी शासनाकडून मोठा निधी आणणार आहे. गेल्या निवडणुकीत शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणा संचालक मंडळाने पूर्ण केल्या आहेत. पण काहीजण केवळ फुशारक्या मारतात, त्यांचा हिशोब करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सभेस सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles