सहकारी पाणी पुरवठा संस्थांना वीज बिल माफ करा मनोहर शिंदे
गो-का-क सहकारी पाणी पुरवठा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –
सातारा जिल्ह्यातील आदर्श ठरलेल्या गो-का-क सहकारी पाणी पुरवठा संस्थेची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन मनोहर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या सभेत सहकारी पाणी पुरवठा संस्थांना वीज बिल माफ करावे. अथवा, सौर ऊर्जा प्रकल्पांना १०० टक्के अनुदान द्यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली.
सन १९६६ मध्ये गोळेश्वर, कापील, कराड व मलकापूर या गावांतील शेतकऱ्यांनी जमिनी तारण ठेवून स्थापन केलेल्या या संस्थेचे उद्घाटन १९७१ साली तत्कालीन गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. गेल्या सहा दशकांत संस्थेने केवळ पाणीपुरवठाच नाही, तर रोपवाटिका, खत विक्री विभाग, कृषी औजारे बँक, आंबा बाग, ऊस बियाणे, शेती अभ्यास दौरे अशा उपक्रमांतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहेत.
संस्थेकडे कोयना व कृष्णा नदीवर उभारलेल्या लिफ्ट योजनांतून तब्बल ६३० एचपी क्षमतेच्या मोटारी आहेत. या माध्यमातून १४०० सभासदांना पाणीपुरवठा केला जातो. शेतकऱ्यांच्या वाढत्या खर्चाचा विचार करता वीज दरवाढीचा मोठा बोजा बसतो. यासंदर्भात बोलताना चेअरमन शिंदे म्हणाले, राज्यात ७.५ एचपीपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज मिळते, मात्र सहकारी पाणी पुरवठा संस्थांना हा लाभ मिळत नाही. प्रत्यक्षात एका सभासदाचा वीज वापर ०.४५ एचपी एवढाच आहे. त्यामुळे पाणीपुरवठा संस्थांना वीज माफी देणे, अथवा सौर प्रकल्पांसाठी १०० टक्के अनुदान देणे गरजेचे आहे.
सभेत शासनाकडे ठराव पाठवण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. तसेच संस्थेच्या सलग दोन पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्याबद्दल चेअरमन शिंदे यांनी सभासदांचे आभार मानले. भविष्यात कमी दरात पाणी उपलब्ध करून देणे आणि नवे उपक्रम राबवून संस्थेचे उत्पन्न वाढवण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.
वार्षिक सभेत श्रद्धांजली अर्पण, वार्षिक अहवाल सादरीकरण, नव्या संचालकांचा परिचय असे विविध कार्यक्रम झाले. यावेळी संस्थेचे नवनिर्वाचित, तसेच आजी-माजी पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.