आयुष्यमान स्पेशलमहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम

स्व. आमदार अण्णासाहेब पाटील — माथाडी कामगार चळवळीचे जनक व मराठा आरक्षणाचे शिल्पकार

 

जन्म व बालपण

जन्म: २५ सप्टेंबर १९३३, मौजे मंद्रुळकोळे, ता. पाटण, जि. सातारा.

शेतकरी कुटुंबात जन्म, मातोश्री सखुबाई यांच्या संस्कारातून परिश्रमाची गोडी.

दहावीपर्यंत शिक्षण, त्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मुंबई गाठली.

कामगार चळवळीची सुरुवात

दारुखाना येथे लाकडाच्या वखारीत मजुरी करताना मजुरांचे शोषण पाहिले.

तेथेच बॉम्बे टिंबर अलाईड वर्कर्स युनियनची स्थापना.

१९६२ मध्ये दारुखाना, मुंबई येथे आपल्या घरीच कामगार चळवळीची सुरुवात.

१९६४ मध्ये महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन नोंदणीकृत.

माथाडी कामगारांसाठी संघर्ष

माथाडी अॅक्ट १९६९ तयार करण्यास शासनाला भाग पाडले.

राज्यात ३६ माथाडी मंडळे स्थापली.

कामगारांना न्याय व सन्मान मिळवून देण्यासाठी अनेक ऐतिहासिक लढे लढले.

आज संघटना आशियातील बलाढ्य व लढाऊ संघटना म्हणून ओळखली जाते.

सामाजिक कार्य

कामगारांसाठी शिक्षण, आरोग्य, पतपेढी, ग्राहक सोसायटी, हॉस्पिटल यांसारख्या संस्था उभारल्या.

समाजातील विविध घटकांना एकत्र आणून अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना.

मराठा आरक्षण आंदोलन

२२ मार्च १९८२ रोजी विधानभवनावर विराट मराठा मोर्चा.

मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांना नऊ मागण्यांचे निवेदन सादर.

“मराठा समाजाला न्याय न मिळाल्यास उद्याचा सुर्योदय मी पाहणार नाही” अशी ठाम भूमिका.

२३ मार्च १९८२ रोजी वयाच्या अवघ्या ४९ व्या वर्षी बलिदान.

गौरवशाली वारसा

माथाडी कामगारांच्या न्यायहक्कासाठी केलेला संघर्ष आजही प्रेरणादायी.

अण्णासाहेबांचे शिलेदार संघटना चालवित असून त्यांच्या शिकवणुकीनुसार लढे सुरू आहेत.

मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे या त्यांच्या भूमिकेला पुढे नेत शासन निर्णय झाले.

ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळीचे संस्थापक व मराठा आरक्षण मागणीचे शिल्पकार, माथाडी कामगारांचे आराध्यदैवत स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळीचे जनक आणि महाराष्ट्रातील तमाम माथाडी कामगारांचे तारणहार व भाग्यविधाते स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांची २५ सप्टेंबर रोजी ९२ वी जयंती नवीमुंबईत साजरी होत आहे. या जयंतीनिमित्त अण्णासाहेबांच्या पवित्र स्मृतीला भावपुर्ण आदरांजली व विनम्र अभिवादन.

स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त कामगार व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कर्तव्यतत्पर कारकिर्दीची दखल घेणे ही आजच्या काळाची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये अनेक मान्यवर कामगार नेते होऊन गेले, त्यांच्या कामगार चळवळीतील वैशिष्टपूर्ण योगदानाचा इतिहास आपणां सर्वांना माहित आहेच. त्याचप्रमाणे स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या कामगार चळवळीतील अनोख्या आणि अजोड कार्याची नोंदही इतिहासाने घेतली आहेच, पण आजच्या कामगार क्षेत्रातील ढासळत्या परिस्थितीचा विचार केल्यास अशा दूरदृष्टी लाभलेल्या तत्कालिन लोकप्रिय नेत्याच्या कार्याची दखल घेऊन ती जनसामान्यांपर्यंत पोहचविणे हे अत्यावश्यक आहे.

सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील मौजे मंद्रुळकोळे या छोट्याशा गांवात कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांचा दि.२५ सप्टेंबर, १९३३ रोजी जन्म झाला, शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अण्णासाहेबांना त्यांच्या मातोश्री सखुबाई यांनी उपजतच परिश्रमाचे बाळकडू पाजले होते, शाळेत शिक्षण घेता-घेता शेतील राबणा-या अण्णासाहेबांनी जेमतेम १० वी पर्यंत शिक्षण घेतले, त्यानंतर आपल्या कुटुंबियांच्या पालनपोषणासाठी मुंबई गाठली. कौटुंबिक हालाखीच्या परिस्थितून कमी शिक्षण घेतल्यामुळे मेहनतीच्या कामाशिवाय त्यांना पर्याय नव्हता, त्यामुळे त्यांनी ऊसाच्या चरख्यावर मेहनतीचे काम केले आणि त्यानंतर दारुखाना येथिल लाकडाच्या वखारीत मजूर म्हणून नोकरी पत्करली, हे हमालीचे काम करीत असताना आपल्या बरोबरीच्या कामगारांच्या कष्टाची होणारी आर्थिक पिळवणुक पाहून त्यांनी त्या लाकडाच्या वखारीतच बॉम्बे टिंबर अलाईड वर्कर्स युनियनची स्थापना केली, तेथूनच त्यांनी कामगार चळवळीला वाहून घेण्याचे वृत्त स्विकारले व सन १९६२ साली दारुखाना, मुंबई येथिल त्यांच्या रहात्या घरीच कामगार चळवळीला सुरुवात केली आणि सन १९६४ मध्ये महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन (रजि.) या नांवान युनियनला रितसर नोंदणी मिळाली.

मुंबईमध्ये मालाची चढ-उताराची कष्टाची कामे करणा-या कामगारांची ऐतिहासिक अशी चळवळ उभी राहिली. या चळवळीला आधुनिक महाराष्ट्रांचे शिल्पकार स्व. यशवंतरावजी चव्हाण तसेच स्व. वसंतदादा पाटील, स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई, स्व. वसंतराव नाईक, स्व. नरेंद्रजी तिडके यांनी माथाडी कामगार चळवळ उभी करण्यासाठी स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांना मोलाचे सहकार्य केले.

स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी अहोरात्र मेहनत करुन अनेक अभूतपुर्व असे लढे उभे करुन माथाडी कामगारांना ‘ना भुतो ना भविष्यती’ असा न्याय दिला. माथाडी अॅक्ट, १९६९ या कायद्याची निर्मिती करण्यास शासनाला भाग पाडले तर कामगार विभागामार्फत राज्यात ३६ माथाडी मंडळाच्या स्थापना करण्यासही शासनास भाग पाडले. व्यवसायनिहाय बृहन्मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हानिहाय माथाडी मंडळे कार्यरत आहेत.

माथाडी कामगार चळवळीच्या क्रांतीकारी संघर्षमय आंदोलनामध्ये कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी उभारलेली ऐतिहासिक आंदोलने आजही माथाडी कामगारांना पुढील काळात अन्यायाविरुध्द लढण्यासाठी प्रेरणा देणारी दिशादर्शक अशीच आहेत. त्यामुळे अण्णासाहेबांच्या गौरवशाली कार्याची माहिती सर्वश्रुत आहेच, परंतु त्यांच्या ऐतिहासिक कार्याला इतिहासही साक्षिदार आहे कारण अण्णासाहेबांची माथाडी कामगार संघटना ही आज आशिया खंडातील बलाढ्य व लढाऊ कामगार संघटना म्हणून ओळखली जात आहे.

अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या तीन मुलभूत गरजा आहेत, असे आजही म्हटलं जातं पण या गरजांमध्ये अण्णासाहेबांनी शिक्षण, आरोग्य, आर्थिक सहकार्य करणा-या माथाडी पतपेढी, माथाडी ग्राहक सोसायटी, माथाडी हॉस्पीटल इत्यादी संस्थांची निर्मिती केली.

याबरोबरच अण्णासाहेब पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत शिवरायांना अपेक्षित असणा-या बारा बलुतेदार व आठरापगड जातीना एकत्रित करुन मराठ्यांचे संघटन उभं रहावे म्हणून महाराष्ट्रातील लहान-मोठ्या संघटना, गणेशोत्सव मंडळे भगव्या ध्वजाखाली एकत्र आणून अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना केली व त्याचवेळी मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आधारीत आरक्षण मिळावे म्हणून मुंबईत विधानभवनावर मराठ्यांचा भव्य मोर्चा काढण्याचा निश्चय केला. अण्णासाहेब पाटील यांनी आपल्या सहकार्यांसमवेत दि. २२ मार्च, १९८२ रोजी विधानभवनावर मराठा समाजाचा विराट मोर्चा काढला, कोणतीही राजकिय रसद न घेता भगवे झेंडे फडकवत विराट मोर्चातील जनसमुदाय मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत होता. मुंबईतील काळाघोडा या ठिकाणी पोहचलेल्या मोर्चासमोर कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी आपले दूरदृष्टीने भविष्यकालीन विचार प्रकट केले व तत्कालिन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांना नऊ मागण्यांचे निवेदन सादर केले. आरक्षण मागणीचा विचार होणार नाही हे लक्षात येताच मराठा समाजाला न्याय न मिळाल्यास आपण उद्याचा सुर्यादय पहाणार नाही, असे ठणकाऊन सांगणा-या अण्णासाहेबांनी दि.२३ मार्च, १९८२ रोजी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन आपली जीवनयात्रा संपविली व या जगाचा निरोप घेतला.

वयाच्या अवघ्या ४९ वर्षाच्या कारकिर्दीत अण्णासाहेबांनी केलेले कार्य हे आपल्या सर्वांना चिरकाल प्रेरणा देणारे असेच आहे. अशा या इतिहास पुरुषाला आजच्या त्यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन व भावपुर्ण आदरांजली.

अण्णासाहेबांच्या ऐतिहासिक आंदोलनांतून प्रेरणा घेऊनच महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्य अथक सुरु आहे. मधल्या काळात अण्णासाहेबांनी महाराष्ट्र शासनाला निर्माण करण्यास भाग पाडलेल्या कायद्यात अनेकवेळा बदल करण्याचे शासकिय पातळीवरुन प्रयत्न झाले, पण अण्णासाहेबांच्या शिकवणुकीतून तयार झालेल्या शिलेदारांनी शासकिय व सामाजिक पातळीवर अथक परिश्रम घेऊन हा कायदा अबाधीत ठेवला. संघटनेने माथाडी कामगारांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांसंदर्भात अग्रेही भूमिका घेऊन शासनास रोखले. आजही या संघटनेचे काम अण्णासाहेबांच्या ध्येय-धोरणानुसार प्रेरीत होऊन संघटनेचे सरचिटणीस श्री. नरेंद्र अण्णासाहेब पाटील, कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, अध्यक्ष एकनाथ जाधव व इतर पदाधिकारी आणि कामगार कार्यकर्ते अहोरात्र झटून करीत आहेत.

अण्णासाहेबांच्या तत्कालिन भूमिकेनुसार मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे या धोरणाप्रमाणेच गेल्या चार-पाच वर्षापासून चालू असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सातत्याने लढे व आंदोलने चालू होती, अण्णासाहेबांच्या विचारानुसारच आजही शासनातर्फे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीससाहेब यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी योग्यतो निर्णय घेतला असून, मराठा आरक्षण उच्च न्यायालयातही टिकवून धरण्याचे काम मा. ना. देवेंद्रजी फडणवीससाहेब यांनी केले आहे.

Related Articles