सातारा जिल्हाहोम

कृष्णा परिवाराकडून सामान्य घटकाचे जीवनमान उंचावण्याचे कार्य – जयकुमार रावल

कृष्णा कॅम्पसला भेट देऊन कार्याची घेतली माहिती

कराड/प्रतिनिधी : –

कृष्णा परिवाराने मागील पाच दशकांपासून अविरतपणे समाजातील सामान्य घटकाचे जीवनमान उंचावण्याचे कार्य केले आहे. कृष्णा परिवाराचे हे कार्य प्रेरणादायी असून, महाराष्ट्र आणि देशासाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहे, असे गौरवोद्गार राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल यांनी काढले.

कराड दौऱ्यावर आले असता ना. रावल यांनी कृष्णा कॅम्पसला भेट देऊन, इथल्या कार्याची माहिती घेतली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले व विनायक भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

ना. रावल त्यांनी कृष्णा विद्यापीठ व कृष्णा हॉस्पिटलमधील विविध विभागांना, तसेच कृष्णा बँक आणि कृष्णा सरिता बझारच्या कार्यालयांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, आम्ही कृष्णा परिवाराचे नाव नेहमी ऐकत आलो आहोत, मात्र प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर त्यांच्या कार्याची व्याप्ती किती मोठी आहे हे जाणवले. कृष्णा परिवाराने महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात अनन्यसाधारण व महत्त्वाचे कार्य केले आहे. एवढे विशाल विश्व उभे करणे सोपे नाही. हीच प्रेरणा घेऊन आम्ही आमच्या परिसरात काही निर्माण करू शकलो, तर ते आमच्यासाठी मोठे काम ठरेल.

यावेळी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.एम.व्ही. घोरपडे, उपकुलसचिव एस.ए. माशाळकर, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे, मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर डॉ.आर.जी. नानिवडेकर, कृष्णा फौंडेशनचे कार्यकारी संचालक प्रा.डॉ. विनोद बाबर, कृष्णा नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैशाली मोहिते, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव जाधव, कृष्णा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

 

Related Articles