आमदार मनोज घोरपडे यांच्या जनता दरबारास जनतेचा प्रचंड प्रतिसाद

कराड/प्रतिनिधी : –
कराड उत्तर मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या अडचणींना तात्काळ न्याय मिळावा आणि प्रशासन लोकाभिमुख व्हावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या जनता दरबार उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हेळगाव येथे झालेल्या जनता दरबारामध्ये तब्बल २०० हून अधिक समस्यांचा निपटारा जागेवरच करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार मनोज घोरपडे म्हणाले, कराड उत्तर मतदारसंघातील विकासाचा उर्वरित बॅकलॉग भरून काढण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या सहकार्याने लोकोपयोगी कामे गतीने राबवली जातील. लोकांच्या प्रश्नांना तात्काळ तोडगा मिळणे हीच खरी लोकसेवा आहे.
जनता दरबाराच्या उद्घाटनप्रसंगी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, आरटीओ सुदर्शन देवडे, उपनिबंधक अपर्णा यादव, नायब तहसीलदार बाजीराव पाटील, कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, शिक्षणाधिकारी बिपिन मोरे, तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
प्रांताधिकारी म्हेत्रे यांनी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगून शासनाच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
हेळगाव येथील जनता दरबारात सुमारे तीन तास आमदार मनोज घोरपडे यांनी स्वतः उपस्थित राहून लोकांच्या तक्रारी ऐकल्या. प्रशासनाला तात्काळ कारवाईचे निर्देश देत त्यांनी २०० पेक्षा अधिक समस्यांचे निपटारे तत्काळ केले. उर्वरित समस्यांवर लवकरच कार्यवाही होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत पाटील यांनी, सूत्रसंचालन संभाजी पाटील, तर अमर पाटील यांनी आभार मानले.