सातारा जिल्हाहोम

कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट

कराड/प्रतिनिधी : –

भारत फोर्ज लिमिटेडचे चेअरमन, उद्योगपती पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांनी त्यांच्या पत्नी सौ. सुनिता कल्याणी यांच्यासह रोटरी क्लब ऑफ कराडला सदिच्छा भेट दिली.

याप्रसंगी रोटरीचे अध्यक्ष डॉ. शेखर कोगनुळकर व सौ. अर्चना कोगनुळकर यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी डॉ. शेखर यांनी रोटरी क्लब कराडची स्थापना पद्मश्री निळकंठराव कल्याणी यांनी कशी केली व मागील 68 वर्षांपासून क्लब सातत्याने समाजोपयोगी कार्य कसे करीत आहे, याचा आढावा घेतला. तसेच आगामी काळात विद्युत गॅस दाहिनी, कचरा व्यवस्थापन, ह्युमन मिल्क बँक, निओनेटल केअर युनिट व शेतीपूरक प्रकल्प राबविण्याचा क्लबचा संकल्प उपस्थितांसमोर मांडला.

कार्यक्रमाला उपस्थित असलेले सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी कल्याणी कुटुंबाचा कराडपासून भारत फोर्जच्या जागतिक प्रवासापर्यंतचा गौरवशाली इतिहास उलगडला. कल्याणी कुटुंबाचे कराडसाठीचे योगदान अनमोल असून, भविष्यातही या कुटुंबाकडून कराड व परिसराच्या विकासासाठी उदात्त सहाय्य मिळावे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांनी कराड रोटरी क्लब अतिशय सुंदर आणि प्रभावी सामाजिक कार्य करत आहे, त्याला आम्ही निश्चितच मदत करू, असे आश्वस्त केले.

कार्यक्रमात रोटरी क्लब कराड व रोटरॅक्ट क्लब कराडचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.विनायक राऊत यांनी आभार मानले.

Related Articles