सातारा जिल्हाहोम

विद्यार्थ्यांनी आपल्यातील सर्वोत्तम गुण ओळखून ध्येय निश्चित करावे – डॉ. सुरेश भोसले

कृष्णा कृषी महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ समारंभ उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –

विद्यार्थ्यांनी आपल्यातील सर्वोत्तम गुण ओळखावा. त्याचबरोबर आयुष्यातील ध्येय निश्चित करून यश संपादन करावे, असे प्रतिपादन कराडचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले होते.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना संचलित जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील,जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, श्रीरंग देसाई, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार,मनोज पाटील, वैभव जाखले, प्राचार्य डॉ.अशोक फरांदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

चेअरमन डॉ. भोसले म्हणाले, कृषी अभ्यासक्रमाचे शिक्षण आपण सर्व विद्यार्थी घेत आहात, ही भाग्याची गोष्ट आहे. आज कृषी शिक्षणाला सर्वात जास्त महत्त्व आहे. विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणामुळे नोकरीत, तसेच व्यवसायात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यांना संशोधनाची दालने खुली असून, कृषी क्षेत्रात नवनवीन संशोधन करून त्यांनी शेतकर्‍यांच्या प्रगतीसाठी आपल्या ज्ञानाचा वापर करावा, असे आवाहनही डॉ. भोसले यांनी केले.

याप्रसंगी बोलताना प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे म्हणाले, विद्यार्थ्यांनी खिलाडू वृत्तीने जगले पाहिजे. त्यांनी स्वयंशिस्त, चिकाटी, कठोर परिश्रम, तसेच चांगले गुण आत्मसात केले पाहिजेत. आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, सूत्रसंचालन डॉ. अजित पवार यांनी, तर डॉ. सारंग कुंभार यांनी आभार मानले.

Related Articles