‘महिला मर्चंट’ची ४०० कोटी व्यवसायाकडे वाटचाल – अध्यक्षा सौ. कविता पवार

संस्थेस ४ कोटी १० लाखांचा निव्वळ नफा, सभासदांना १२ टक्के लाभांश
कराड/प्रतिनिधी : –
महिला मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था मर्या; कराडची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात पार पडली. याप्रसंगी ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात संस्थेचा व्यवसाय तब्बल ३३५ कोटी रुपयांवर पोहोचला असून, पुढील वर्षात ४०० कोटींच्या व्यवसायाचे ध्येय ठेवण्यात आले असल्याचे अध्यक्षा सौ. कविता पवार यांनी सांगितले.
संस्थेच्या आर्थिक कामगिरीचा आढावा घेताना अध्यक्षा सौ. पवार म्हणाल्या, संस्थेचे वसुल भागभांडवल ११ कोटी ३३ लाख, सभासद संख्या १८ हजार ६००, एकूण निधी ३५ कोटी, गुंतवणूक १२५ कोटी, ठेवी २०५ कोटी, तर कर्जवाटप १३० कोटी इतके झाले आहे. सर्व तरतुदी वजा जाता संस्थेला ४ कोटी १० लाखांचा निव्वळ नफा झाला असून, एनपीएएचे प्रमाण शून्य टक्के राखण्यात यश आले आहे. सभासदांना यंदा १२ टक्के लाभांश जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बँकेच्या सर्व शाखांमध्ये CBS प्रणाली, RTGS, NEFT, IMPS, मोबाईल बँकिंग, SMS सुविधा कार्यान्वित केल्या आहेत. नवरात्र, दसरा, दिवाळीनिमित्त ५७५ दिवसांच्या मुदत ठेवींवर ९.५ टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी २२ महिन्यांच्या मुदतीवर १० टक्के व्याजदराची योजना जाहीर करण्यात आली आहे.
याप्रसंगी सभेत पहिल्या महिला रिक्षाचालक मंगल आबा आवळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पुण्याच्या “प्रयास हेल्थ ग्रुप”ला कॅन्सर व एड्सग्रस्तांसाठी मदतीपोटी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. याशिवाय महावीर गोपालन सेवा संस्था कराड ३ लाख, लिबर्टी मजदूर मंडळ ३ लाख, तर अनुराम सपोर्ट फाउंडेशनच्या ‘पसायदन’ वृद्धाश्रम प्रकल्पाला २ लाख ५१ हजारांची मदत संस्थेकडून देण्यात आली.
वारूंजी शाखा सल्लागार समितीचे सदस्य व सीए पी.एल. कुलकर्णी यांचे नातू पुष्कराज कुलकर्णी यांचा सीए परीक्षेत यश मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. संस्थापक सौ. भारती मिनीयार यांनी मर्चंट कल्याणी ठेव व कर्मचारी कल्याण ठेव योजनेबाबत माहिती देऊन सभासदांना सहभागी होण्याचे आवाहन केले. शाखा समिती सदस्य सौ. गीता पाटील यांनी संस्थेच्या आर्थिक सहकार्यामुळे झालेल्या स्वतःच्या प्रगतीचा अनुभव मांडला. सभेचे स्वागत अॅड. सौ. अमिता रैनाक यांनी, सूत्रसंचालन अंजली बाकळे यांनी, तर चेअरमन सौ. सुवर्णा सादिगले यांनी आभार मानले.