सातारा जिल्हाहोम

माजी सैनिक प्रशांत कदम यांना ‘इंडियन एक्सलेन्स स्टार अवार्ड प्रदान

कराड/प्रतिनिधी : –

कराड तालुक्यातील माजी सैनिक व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कदम यांना मुंबई येथे राज्यस्तरीय “इंडियन एक्सलेन्स स्टार अवार्ड २०२५” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंचरत्न मित्र मंडळ यांच्या वतीने १४ सप्टेंबर रोजी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी खासदार व आमदार ब्रिगेडियर सुधीर सावंत (नि.) व पार्श्वगायक श्री दादूस यांचे हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्री. कदम यांनी १९९१ ते २००७ या कालावधीत सैन्यात सेवा करताना जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, ईशान्य भारत अशा संवेदनशील ठिकाणी कामगिरी बजावली. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी यशवंत चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करून युवकांना सैन्य व पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन, फिजिकल ट्रेनिंग, शैक्षणिक गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान व गरजूंना मदत अशी अनेक सामाजिक कार्ये सुरु ठेवली.

सैनिकांच्या समस्या, शहीद जवानांच्या कुटुंबीयांना न्याय, तसेच “अमृत वीर जवान अभियान” राबविण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. सातारा जिल्ह्यात सैनिक संपर्क अभियान, सैनिक कक्षाची स्थापना, तिरंगा रॅली, सैनिक सन्मान सोहळे असे विविध उपक्रम त्यांनी राबवले. यापूर्वी त्यांना “सैनिक योद्धा”, “आदर्श सैनिक” व “प्रेरणा” असे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. सध्या ते सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून, सैनिक व समाजकल्याणासाठी झटत आहेत.

Related Articles