सातारा जिल्हाहोम

कृष्णा सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार प्रदान

कराड/प्रतिनिधी : –

कृष्णाकाठच्या ग्रामीण भागाची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कृष्णा सहकारी बँकेला नाशिक येथे नुकत्याच झालेल्या दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आ. प्रवीण दरेकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कृष्णा बँकेच्या संचालकांनी व अधिकार्‍यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

कृष्णा बँकेने चेअरमन आ.डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा विस्तार केला असून, सामान्य माणसांसाठी कार्य आणि सभासद हिताचा कारभार या उद्दिष्टाने बँकेने वाटचाल सुरु ठेवली आहे. सहकार क्षेत्राला बळकटी आणणार्‍या अशा सहकारी बँकांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनच्यावतीने दरवर्षी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या बँकांना पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा या संस्थेने राज्यातील ५०० ते १००० कोटी रूपयांपर्यंतच्या ठेवी असणार्‍या नागरी सहकारी बँकांची पाहणी करून, या विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदविणारी बँक म्हणून कृष्णा सहकारी बँकेची प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड केली होती.

 

नाशिक येथे आयोजित दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आ. प्रवीण दरेकर, नॅशनल अम्ब्रेला ऑर्गनायझेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह बँक्सचे अध्यक्ष ज्योतिंद्रभाई मेहता व फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा यांच्या हस्ते कृष्णा बँकेच्या संचालकांनी व अधिकार्‍यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

यावेळी बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव थोरात, हर्षवर्धन मोहिते, प्रमोद पाटील, शिवाजी पाटील, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्रदीप पाटील, दिलीपराव पाटील, हेमंत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव, व्यवस्थापक गणपती वाटेगावकर उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल बँकेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles