सातारा जिल्हाहोम

राजेंद्रसिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

कराड/प्रतिनिधी : –

सातारा जिल्हा शिवसेना समन्वयक व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचा वाढदिवस दरवर्षी युवा प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही १८ व १९ सप्टेंबर रोजी दोन दिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मित्रपरिवाराच्या वतीने देण्यात आली.

गेल्या २५ वर्षांपासून नगरसेवक, सभापती, उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले यादव यांच्या नेतृत्वाखाली गेली दहा वर्षे नगरपरिषदेत यशवंत विकास आघाडीची सत्ता आहे. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सहकार्याने त्यांनी कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी फेज-२ संकल्पना प्रत्यक्षात आणली. रस्त्यांचे डांबरीकरण, गटारबंदी, पाणीपुरवठा, ड्रेनेज लाईन, पाण्याच्या टाक्या, पंपिंग स्टेशन, संविधान भवन, अभ्यासिका, व्यायामशाळा अशा अनेक पथदर्शी विकासकामांचा यात समावेश आहे.

वाढदिवसानिमित्त गुरुवार, दि. १८ रोजी यशवंत विकास एकता मॅरेथॉन, वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप, रोग निदान शिबिर, महिला स्वसंरक्षण स्पर्धा, गोरक्षणात चारा वाटप, विविध विकास कामांची भूमिपूजने, सायंकाळी साडी वाटप करण्यात येणार आहे. तर शुक्रवार, दि. १९ रोजी यादव यांचे देवदर्शन व स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादनानंतर रक्तदान शिबिर, संगीत व शालेय साहित्य वाटप, रोग निदान शिबिर, रोजगार मेळावा, गुणवंत विद्यार्थी-शिक्षकांचा सन्मान, उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता किट व फळे वाटप, बसस्थानक येथे बाकांचे लोकार्पण अशा कार्यक्रमांचे आयोजन आहे. संध्याकाळी ४ ते ९ या वेळेत नगरपालिका शाळा क्र.३ येथे अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे.

राजकारणाबरोबर सामाजिक बांधिलकी जपत यादव मित्रपरिवाराच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून रोजगार मेळावे, गरीब-गरजूंना मदत, विविध योजना राबविल्या जात आहेत. आजवर या रोजगार मेळाव्यांमधून कराड व परिसरातील सुमारे पाच हजार युवकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. युवा प्रेरणा दिनाच्या या सामाजिक उपक्रमांमध्ये कराड शहरातील नागरिक व शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles