आदरणीय पी.डी. पाटील सहकारी पाणी पुरवठा संस्थेची वार्षिक सभा उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –
आदरणीय स्व. पी. डी. पाटील यांनी स्थापन केलेल्या पी. डी. पाटील सहकारी पाणी पुरवठा मंडळी लि., कराड या संस्थेची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी, दि. १२ रोजी संस्थेच्या कार्यालयात झाली. अध्यक्षस्थानी राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री, तसेच संस्थेचे मार्गदर्शक माजी आ. बाळासाहेब पाटील होते.
सभेच्या प्रारंभी विविध क्षेत्रातील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविकात संचालक डॉ. पार्थेश पाटील यांनी संस्थापक स्व. पी. डी. पाटील यांच्या कार्याचा गौरव करत गेल्या ६० वर्षांत वाकाण शिवारातील शेतकऱ्यांच्या झालेल्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. सेक्रेटरी श्री. रामचंद्र पानवळ यांनी सभेची नोटीस वाचन करून कार्यक्रमपत्रिकेवरील विषयांवर चर्चा केली. सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना बाळासाहेब पाटील यांनी संस्थापक स्व. पी. डी. पाटील यांच्या कार्याचा गौरव करत, गेल्या ६० वर्षांत वाकाण शिवारातील शेतकऱ्यांची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगती ही त्यांच्या दूरदृष्टी व कार्यामुळेच शक्य झाली, असे मत व्यक्त केले. तसेच संस्थेच्या कामकाजाचे कौतुक केले. संस्थेच्या कार्यालयीन इमारतीचा वापर शेतकरी व नागरिक धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमासाठी करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. इमारतीची दुरुस्ती व वाढीव बांधकामाविषयी संचालक मंडळाने योग्य निर्णय घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. कराड नगरपरिषदेच्या हद्दवाढीमुळे संस्थेपुढे निर्माण झालेल्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी सामूहिक विचारविनिमय करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
संस्थेचे संचालक श्री. येडगे यांनी आभार मानले. यावेळी विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, संचालक, तसेच मोठ्या संख्येने सभासद शेतकरी उपस्थित होते.