सातारा जिल्हाहोम

जनकल्याण पतसंस्थेचा एकत्रित व्यवसाय ९३८ कोटींच्या उंबरठ्यावर

३० वी वार्षिक सभा उत्साहात; सभासदांना ११ टक्के लाभांश जाहीर

कराड/प्रतिनिधी : –

जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराडची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, दि. ९ रोजी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक फडके यांनी सभेची नोटीस वाचन, तसेच सूत्रसंचालन केले. संचालक मंडळाने मांडलेल्या सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.

अध्यक्ष देशपांडे यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा सादर केला. ३१ मार्च २०२५ अखेर संस्थेकडे ५५७ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या असून, ३८१ कोटींचे कर्जवाटप केले आहे. २५३ कोटींची सुरक्षित गुंतवणूक असून, संस्थेचा एकत्रित व्यवसाय तब्बल ९३८ कोटी कोटींवर पोहोचला आहे. तरतूदीअंती नफा ७ कोटी ७ लाख रुपये नोंदवला गेला आहे. सहकारी पतसंस्थांच्या नियामक मंडळाने ठरवून दिलेल्या सीआरएआर १८.०७ टक्के, सीआरआर ३.५१ टक्के व एसएलआर २५.३६ टक्के इतके आवश्यक प्रमाण राखले असून, अकाउंटिंग स्टँडर्डचे पालन करत संस्थेस वैधानिक लेखापरीक्षकांकडून “अ” वर्ग मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.

सभेत विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. भिक्षेकरी ते कष्टकरी या ध्येयाने झपाटून पुण्यात कार्यरत असलेल्या आणि भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. अभिजीत व डॉ. मनीषा सोनवणे या दांपत्याला संस्थेचा चौथा ‘जनकल्याण गौरव पुरस्कार’ निवृत्त आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर विशेष विकलांग विद्यार्थ्यांसाठी संचलित शैक्षणिक संस्थांद्वारे निरंतर सेवाकार्य करणाऱ्या अॅड. राणी चोरे यांना ‘जनकल्याण सेवा सन्मान पुरस्कार’ जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सभासदांच्या हितासाठी संस्थेकडून यंदा ११ टक्के लाभांश वितरित करण्यात येणार असल्याची घोषणा अध्यक्षांनी केली. गेल्या ३० वर्षांत सभासदांनी दाखविलेला विश्वास आणि संचालक मंडळाला दिलेला पाठिंबा याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी पुढेही असा सहकार्यभाव कायम राहील, असा विश्वासही व्यक्त केला.

सभेत उपाध्यक्ष अभिजीत चाफेकर, संचालक डॉ. प्रकाश सप्रे, डॉ. अविनाश गरगटे, सीए शिरीष गोडबोले, एकनाथ फिरंगे, हिंदुराव डुबल, जितेंद्र शहा, मोहन सर्वगोड, डॉ. सुचिता हुद्देदार, सौ. वर्षा कुलकर्णी, सौ. पुनम वास्के, दीपक जोशी, प्रविण देशपांडे, सुनिल कुलकर्णी, सीए आशुतोष गोडबोले, अशोक आटकर आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या संचालिका डॉ. सुचिता हुद्देदार यांनी आभार मानले.

Related Articles