सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
स्वयंरोजगार प्रोत्साहन व बेरोजगारांसाठी विशेष कर्ज योजना राबविणार
कोयना सहकारी बँकेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
18 2 minutes read

कराड/प्रतिनिधी : –
कोयना सहकारी बँक लि., कराडची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन कृष्णत (के. टी.) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मार्केट यार्ड येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेत बँकेने सभासदांसाठी अनेक नव्या योजनांची घोषणा करताना स्वयंरोजगार प्रोत्साहन योजना तसेच सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी विशेष कर्ज योजना राबविणार असल्याचे जाहीर केले.
सभेला संस्थापक अॅड. उदयसिंह पाटील, संचालक व युवानेते अदिराज पाटील, बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, प्रा. धनाजी काटकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई, पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेंवाळे, जि.प. सदस्य प्रदीप पाटील, सी.ए. तानाजीराव जाधव यांच्यासह संचालक मंडळ, मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस लोकनेते स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ सहकारी नेते स्व. वसंतराव जगदाळे, शहीद वीर जवान तसेच विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
संस्थापक अॅड. उदयसिंह पाटील सहकार क्षेत्रातील स्व. विलासकाका पाटील व वसंतराव जगदाळे यांच्या योगदानाचा उल्लेख करताना म्हणाले, कोयना बँक, दूध संघ, पतसंस्था, खरेदी विक्री संघ व रयत साखर कारखाना या संस्था सहकार तत्त्वांवर उभ्या राहून सातत्याने कार्यरत आहेत. सहकाराने सर्वसामान्यांना नेतृत्वाची संधी दिली, हीच खरी ताकद आहे.
अध्यक्षीय भाषणात चेअरमन कृष्णत पाटील म्हणाले, नवीन संचालक मंडळाची बिनविरोध निवड म्हणजे सभासदांनी दाखवलेला विश्वासाचे प्रतीक आहे. संस्थापक अॅड. उदयसिंह पाटील व युवा संचालक अदिराज पाटील यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली बँकेने सातत्याने प्रगती साधली आहे.
मार्च २०२५ अखेर बँकेच्या ठेवी १८३ कोटी रुपये, कर्जवाटप १२८ कोटी रुपये, नफा ९० लाख रुपये, खेळते भांडवल २१४ कोटी रुपये, निधी १७ कोटी रुपये, तर एकूण व्यवसाय तब्बल ३११ कोटी रुपयांवर पोहोचल्याचे त्यांनी जाहीर केले.
बँकेने सभासदांसाठी UPI, IMPS, मोबाईल बँकिंग आणि एटीएम सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, सभासदांनी या डिजिटल सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेतून शेकडो तरुणांना कर्जसहाय्य मिळाले असून, याच धर्तीवर बँक स्वयंरोजगार प्रोत्साहन योजना आणि विशेष कर्ज योजना राबविणार आहे. या योजनांमुळे बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांचे आर्थिक सबलीकरण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कर्ज थकबाकी वसुलीवर विशेष भर देऊन वसुली शून्यावर आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जदार, शिफारसकर्ते व सभासदांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सभेचे प्रास्ताविक अधिकारी दिनकर रामिष्ठे यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी जनार्दन माने यांनी वार्षिक अहवाल सादर केला. संचालक तुकाराम डूबल यांनी श्रद्धांजली ठराव मांडला. बँकिंग तज्ञ प्रतापसिंह चव्हाण व आयटी तज्ञ सुनील बोटलवार यांनी सभासदांना मार्गदर्शन केले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. आभार प्रदर्शन उपाध्यक्ष साहेबराव शेवाळे यांनी केले.
18 2 minutes read