सातारा जिल्हाहोम

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी साकारले साक्षरतेचे बोधचिन्ह

कराड/प्रतिनिधी : –

“ज्ञानविना माणूस अपूर्ण” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे औचित्य साधून मलकापूर येथील श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आनंदराव चव्हाण विद्यालय व आदर्श ज्युनिअर कॉलेज येथे एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.

पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागातून मानवी साखळी उभी करून साक्षरता दिनाचे बोधचिन्ह प्रत्यक्ष साकार करण्यात आले. या उपक्रमाची संकल्पना विद्यालयाचे चित्रकला शिक्षक श्री. जगन्नाथ कराळे व श्री. राजेंद्र पांढरपट्टे यांची होती. मुख्याध्यापिका व उपमुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ही भव्य प्रतिकृती साकारून समाजाला साक्षरतेचा संदेश दिला.

याप्रसंगी संस्थेचे सचिव अशोकराव थोरात म्हणाले, आजही निरक्षरतेचे प्रमाण काही ठिकाणी जाणवते. ते दूर करण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमधून अशा प्रकारचे उपक्रम राबविणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी समाजापर्यंत जनजागृतीचा संदेश पोहोचवून खरोखरच प्रशंसनीय कार्य केले आहे. असे सांगून त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.

दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा केला जातो. साक्षरतेचे महत्त्व पटवून देणे, शिक्षणाचा हक्क प्रत्येकापर्यंत पोहोचवणे व समाजातील प्रत्येक व्यक्ती साक्षर होण्यासाठी प्रेरित करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे साकारलेले हे बोधचिन्ह पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली.

Related Articles