भांडवलदारांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी सहकार चळवळीची स्थापना – अॅ ड. उदयसिंह पाटील
कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाकडून सभासदांना 15 टक्के लाभांश जाहीर

कराड/प्रतिनिधी : –
भांडवलदारांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना सन 1937 मध्ये करण्यात आल्याचे प्रतिपादन रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी केले.
कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि., कराडची सन 2024-25 मधील 88 वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन अनिलराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, कोयना दूध संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव, कोयना बँकेचे चेअरमन के. टी. पाटील, स्वातंत्र्यसैनिक शामराव पाटील सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे, प्रा. धनाजी काटकर, माजी जि.प. सदस्य प्रदीप पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अॅ ड. पाटील म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या सहकारविचारातून संघाला बळकटी प्राप्त झाली. लोकनेते स्व. विलासराव (काका) यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने चौफेर प्रगती साधली. त्यांनी रुजविलेली शिस्त आजही संस्थेमध्ये काटेकोरपणे पाळली जात असून त्यामुळेच संघाने संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला आहे.
ते म्हणाले, शेतकऱ्यांना आजच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे. संघामार्फत शेती अवजारे, बी-बियाणे, शेती औषधे, रासायनिक खते तसेच डिझेल-पेट्रोल पंपाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सभासदांनी या सोयींचा लाभ घेऊन संघाच्या प्रगतीत हातभार लावावा.
चेअरमन अनिलराव मोहिते यांनी संघाचा वार्षिक अहवाल सादर केला. ते म्हणाले, सन 2024-25 मध्ये संस्थेची 68 कोटी रुपयांची उलाढाल झाली असून 1 कोटी 87 लाख रुपयांचा व्यापारी नफा मिळाला आहे. सर्व तरतुदीनंतर 12 लाख रुपयांचा निव्वळ नफा संस्थेच्या तिजोरीत जमा झाला आहे. यंदा सभासदांना 15 टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
कार्यक्रमात प्रा. धनाजी काटकर यांनी मनोगत व्यक्त केले. सरव्यवस्थापक शशिकांत पाटील यांनी नोटीस वाचन केले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जाधव यांनी केले. श्रद्धांजली ठराव संचालक प्रताप कणसे यांनी मांडला, तर आभार प्रदर्शन जगन्नाथ मोरे यांनी केले.
सभेस जेष्ठ संचालक हणमंतराव चव्हाण, रंगराव थोरात, श्रीमंत काटकर, आत्माराम जाधव, उत्तम जगताप, बाजीराव पाटील, कैलास साळवे, यशवंत डुबल, मच्छिंद्र बानुगडे, महेश पाटणकर, दिलीप भिसे, किसन चव्हाण आदींची उपस्थिती होती.



