श्री महर्षी वाल्मिकी गणेश मंडळातर्फे ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ भव्य आरोग्य शिबिर उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –
कराड शहरात “श्रीगणेशा आरोग्याचा” या भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन गुरुवार, दि. ४ सप्टेंबर रोजी करण्यात आले. मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार पेठ, शिंदे गल्ली येथील श्री महर्षी वाल्मिकी गणेश मंडळात हे शिबिर पार पडले.
या उपक्रमाचे प्रायोजक उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील स्व. सौ. वैष्णुपाई यशवंतराव चव्हाण होते. स्थानिक नागरिकांसाठी उपयुक्त ठरलेल्या या शिबिरात डॉ. बापू कांबळे, डॉ. ध्रुव पटेल, डॉ. गंगा, नेत्रतज्ज्ञ श्री नवनाथ चोपडे तसेच समुपदेशक महेश शिंदे यांनी तपासण्या केल्या. एकूण ६३ नागरिकांची तपासणी करण्यात आली.
फुफ्फुसविकार, हृदयविकार, कर्करोग, मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा आदी आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री सहायता निधी व महात्मा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत आजार व शस्त्रक्रियांसाठी थेट आर्थिक मदत व मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध असल्याने गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शिबिरावेळी मेहतर समाज अध्यक्ष मनोहर चव्हाण, उपाध्यक्ष सुरेश चव्हाण, मंडळ अध्यक्ष पुष्पक चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभारप्रदर्शन गणेश चव्हाण यांनी केले.