कराड दक्षिणमधील तीन साकव पुलांच्या उभारणीसाठी १.३० कोटींचा निधी
भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून निधी उपलब्ध

कराड प्रतिनिधी : –
कराड दक्षिणमधील ३ गावांमध्ये साकव पुलांच्या उभारणीसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून १.३० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून वडगाव हवेली, आणे आणि महारुगडेवाडी या गावात साकव पूल उभारले जाणार आहेत.
कराड दक्षिण मतदारसंघातील ग्रामीण भागात दळणवळणाच्या सुविधा सुधारण्यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले विशेष प्रयत्नशील आहेत. याअंतर्गत त्यांनी यापूर्वी कराड दक्षिणमधील गावागावांतील पाणंद रस्त्यांसाठी मोठा निधी खेचून आणला आहे. ग्रामीण भागात दळणवळणासाठी साकव पूल अत्यंत महत्वाचे समजले जातात.
कराड दक्षिणमधील विविध गावांमधील साकव पुलांसाठी भरीव निधी उपलब्ध व्हावा, यासाठी गेल्या काही दिवसांपासून आ.डॉ. भोसले शासनस्तरावर पाठपुरावा करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, सातारा जिल्हा नियोजन समितीच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षातील सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून कराड दक्षिणमधील ३ गावांतील साकव पुलांसाठी १ कोटी ३० लाख ४७ हजारांचा निधी मंजूर झाला आहे.
या निधीतून वडगाव हवेली येथील गडकरी मळा रस्त्यावरील ओढ्यावर साकव पूल (४३.८० लाख), आणे येथील देसाई मळा ते नांगरे वस्ती रस्त्यावर साकव बांधणे (३५.६१ लाख) आणि महारुगडेवाडी येथील मोरिवत ओढ्यावर साकव पूल (५१.०६ लाख) उभारण्यात येणार आहे.
या साकव पुलांच्या उभारणीमुळे ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ होणार असून, शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठीही याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे हा निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांमधून भाजपा-महायुती सरकारचे आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.