संताच्या विचारातून बुद्धिप्रामाण्यवाद शिकावा – ॲड. धनराज वंजारी

कराड/प्रतिनिधी : –
संत म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्म यांचे प्रतीक मानले जातात. त्यांचे विचार हे तर्क, अनुभव, आणि विवेक यांच्या आधारे विकसित झालेले आहेत. म्हणूनच, आपल्याला संतांच्या कार्यातून आणि विचारातून बुद्धिप्रामाण्यवाद शिकावा. असे प्रतिपादन व्याख्याते ॲड. माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी केले.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात गणेशोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, सौ. सुलभा वंजारी, एम. के. कापूरकर, बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
ॲड. वंजारी यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्या कार्याचे दाखले देत संताची सामाजिक कार्ये या विषयावर श्रवणीय व्याख्यान दिले. वंजारी पुढे म्हणाले, आपल्या आयुष्यात असलेले दुःख विसरायचं असेल तर संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनातील प्रसंग पहावे. आयुष्यात दुःख आले की आपण भांबवून जातो. पण तसे करणे योग्य नाही. ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आजही समाजाला दिशा देत आहे.
ते म्हणाले, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांचे कार्य हे समाजसुधारणेसाठी होते. त्यांनी लोकांमध्ये श्रद्धा, समता, नीतिमत्ता आणि आध्यात्मिक जागरूकता यांचा प्रचार केला. त्यांच्या कार्यामुळे मराठी समाजाला आध्यात्मिक व सामाजिक उन्नतीचा मार्ग मिळाला.ज्ञानेश्वरांनी “अमृतानुभव” या ग्रंथात केवळ श्रध्देने नव्हे, तर अनुभवातून आलेले ज्ञानच अंतिम सत्य असते. संत तुकाराम महाराजांनी केवळ रूढी, परंपरा आणि कर्मकांडावर विश्वास ठेवू नका असे सांगितले. संतांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सामाजिक कार्याची प्रेरणा तरुण पिढीने घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.