सातारा जिल्हाहोम

क्रांतिसिहांनी वारकऱ्यांचा समतेचा विचार स्वातंत्र्य लढ्यात रुजविला – प्रा.पी.डी पाटील 

कृष्णा कारखान्यावर गणेशोत्सवानिमित्त व्याख्यान

कराड/प्रतिनिधी : –

क्रांतिसिंह नाना पाटील हे लोकशाही विचारांचे पुरस्कर्ते होते. त्यांनी वारकरी संप्रदायातील समतेचा विचार स्वातंत्र्य चळवळीत रुजवून लोकशाही मूल्यांची पायाभरणी केली. जातीभेद, अस्पृश्यता आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध ते ठामपणे लढले. स्त्रियांना समान हक्क व सन्मान मिळावा यासाठीदेखील त्यांनी लढा दिला, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. डॉ. पी. डी. पाटील यांनी केले.

यशवंतराव मोहिते  कृष्णा सहकारी साखर कारखान्यात गणेशोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदिश जगताप, संचालक दयानंद पाटील, बाबासो शिंदे, शिवाजी पाटील, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, एम. के. कापूरकर, बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. पी. डी. पाटील यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याचा उज्ज्वल वारसा समोर ठेवत प्रेरणादायी व्याख्यान दिले. स्वातंत्र्यसंग्राम, प्रतिसरकार चळवळ, जातिभेदाविरुद्धचा लढा आणि स्त्री-पुरुष समतेसाठीचा संघर्ष या महत्त्वाच्या पैलूंवर त्यांनी विशेष प्रकाश टाकत, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा जागर केला.

ते म्हणाले, नाना पाटील यांनी इंग्रज सरकारच्या जुलमी राजवटी विरोधात बंड पुकारला. ब्रिटिश सरकारला समांतर शासन यंत्रणा उभारण्याचा निर्णय करत प्रतिसरकारची स्थापना केली. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याचा अभ्यास केवळ इतिहास म्हणून न करता, वर्तमानकाळातील लोकशाही व सामाजिक न्यायाच्या लढ्यांसाठी त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याची गरज प्रा. डॉ.पी.डी पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles