कराडमधील विकासकाकामांसाठी १० कोटींचा निधी
आमदार अतुलबाबा भोसलेंच्या प्रयत्न; भाजप-महायुती सरकारची मंजुरी

आ. अतुल भोसलेंच्या प्रयत्न; भाजप-महायुती सरकारची मंजुरी
कराड/प्रतिनिधी : – भाजप-महायुती सरकारने कराड शहरातील विविध विकासकाकामांसाठी तब्बल १० कोटींचा निधी मंजूर केला आहे. भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या या निधीच्या माध्यमातून, कराड शहरात नवी उद्याने व क्रीडांगण, सामाजिक सभागृहे, प्रशासकीय इमारतीचे नुतनीकरण, स्मशानभूमीचा विकास अशा पायाभूत कामांना चालना मिळणार आहे. त्यामुळे कराड शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे.
कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले विशेष प्रयत्नशील राहिले आहेत. भाजपा-महायुती सरकारच्या माध्यमातून त्यांनी शहराच्या प्रगतीसाठी अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी यापूर्वीदेखील भरघोस निधी उपलब्ध करुन असून, यात आता आणखी १० कोटींच्या निधीची भर पडली आहे. आ.डॉ. भोसले यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ‘नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान’ या योजनेअंतर्गत नगर विकास विभागाच्यावतीने कराडसाठी १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्याचा शासन आदेश गुरुवार, दि. २८ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या निधीच्या माध्यमातून कराड नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे नुतनीकरण व फर्निचर कामासाठी ३.५० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. तसेच नगरपरिषदेच्या मालकीची हिंदू स्मशानभूमी विकसित करणे (१.२५ कोटी), शनिवार पेठेतील आरक्षित भूखंड क्र. ७२ मधील गार्डन विकसित करणे (१ कोटी), मंगळवार पेठेतील खुल्या जागेत गार्डन विकसित करणे (१ कोटी), बुधवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह व व्यापारी संकुलाचे बांधकाम करणे (१ कोटी), तसेच याच परिसरातील नगर भूमापन क्र. ३५ या सार्वजनिक जागेत अभ्यासिका बांधणे (१ कोटी), रविवार पेठेतील सर्व्हे नंबर ४३० येथे कुंभार समाजाचे सामाजिक सभागृह बांधणे (५० लाख), नगरपरिषदेच्या मालकीच्या आरक्षण क्र. १६ मधील खेळाचे मैदान विकसित करणे (५० लाख) आणि नगरपरिषदेच्या मालकीच्या आरक्षण क्र. १७ मधील गार्डन विकसित करणे (२५ लाख) अशी विकासकामे साकारली जाणार आहेत.
या विकासकामांमुळे शहरातील पायाभूत सुविधा विस्तारण्यास मदत होणार आहे. तसेच शहरातील खुल्या जागांचा विकास होणार असल्याने नव्या उद्यानांची भर पडणार आहे. याचबरोबर खेळाच्या मैदानांचा विकास आणि अभ्यासिकेच्या उभारणीमुळे याचा युवावर्गाला मोठा लाभ होणार आहे. कराड शहरासाठी १० कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल शहवासीयांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासह भाजपा-महायुती सरकारचे आभार मानले जात आहेत.
अशी होणार विकासकामे..
नगरपरिषद इमारत नुतनीकरण : ३.५० कोटी, हिंदू स्मशानभूमीचा विकास : १.२५ कोटी, शनिवार पेठेत गार्डन विकसित करणे : १ कोटी, मंगळवार पेठेत गार्डन विकसित करणे : १ कोटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह व व्यापारी संकुलाचे बांधकाम : १ कोटी, सार्वजनिक जागेत अभ्यासिका बांधणे : १ कोटी, कुंभार समाज सामाजिक सभागृह उभारणी : ५० लाख, खेळाचे मैदान विकसित करणे : ५० लाख, गार्डन विकसित करणे : २५ लाख.
भाजपा-महायुती सरकारने मंजूर केलेल्या या निधीमुळे कराडचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे. या निधीतून शहरात उद्याने, खुल्या जागांचा विकास, खेळाचे मैदान, अभ्यासिका, सभागृह व व्यापारी संकुलाची उभारणी अशा विविध पायाभूत सुविधांची उभारणी केली जाणार आहे. तसेच शहरातील क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, सार्वजनिक सुविधांचा दर्जाही उंचावणार आहे. यापुढेही कराडकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने ठोस पावले उचलत, शासनाच्या माध्यमातून भरघोस निधी मिळवून देण्यास कटीबद्ध आहे.
– आ.डॉ. अतुल भोसले (जिल्हाध्यक्ष, भाजपा, सातारा)