सातारा जिल्हाहोम

मलकापूरच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी ४१ लाखांचा निधी मंजूर

आ. डॉ. अतुल भोसले यांच्या पाठपुराव्याला यश; बायोमायनिंग प्रकल्पासाठी मंजुरी

कराड/प्रतिनिधी : –

मलकापूर (ता. कराड) शहरातील वाढत्या घनकचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शासनाने ४१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नगरविकास विभागाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नगरी) २.० अंतर्गत बायोमायनिंग प्रकल्पासाठी ही मंजुरी मिळाली असून, या निधीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. या प्रकल्पामुळे मलकापूरकरांचा दीर्घकाळाचा कचऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्र शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नगरी) २.० अंतर्गत राज्यातील एकूण ९० नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये जुन्या साठवलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंग प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये मलकापूर नगरपरिषदेचा समावेश व्हावा, यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानुसार या योजनेत मलकापूर नगरपरिषदेचा समावेश झाला असून, त्यासाठी ४१ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

बायोमायनिंग प्रक्रियेद्वारे कचऱ्याखालील जमिनीचा पुनर्वापर शक्य होणार असून, ही जमीन स्थानिक स्वराज्य संस्थांना उपलब्ध करून दिली जाईल. तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक धोके मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

मलकापूर नगरपरिषदेसह राज्यातील पुणे महानगरपालिका, नाशिक, जळगाव, इचलकरंजी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर अशा मोठ्या महानगरपालिकांसह बुलढाणा, भुसावळ, खामगाव, अंबाजोगाई, रेवराई, परळी वैजनाथ, खोपोली, महाड, श्रीगोंदा, माढा अशा लहान-मोठ्या नगरपरिषदांचा या योजनेत समावेश आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शहरे कचरामुक्त करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले असून, जुन्या कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ही प्रक्रिया प्रभावी ठरणार आहे.

तसेच या प्रकल्पामुळे मलकापूर शहरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेली कचऱ्याची समस्या सोडवली जाणार असून शहर अधिक स्वच्छ, आरोग्यदायी व पर्यावरणपूरक होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे हा निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासह भाजपा-महायुती सरकारचे आभार मानले जात आहेत.

बायोमायनिंग प्रक्रिया म्हणजे काय?

बायोमायनिंग म्हणजे जुन्या कचऱ्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करून त्यातून उपयुक्त घटक वेगळे करणे व उर्वरित कचऱ्याची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावणे. या प्रक्रियेमुळे कचऱ्याखालील जमीन पुन्हा वापरासाठी मिळू शकते, तसेच आरोग्य आणि पर्यावरणावरील दुष्परिणाम कमी होणास मदत होणार आहे.

Related Articles