सातारा जिल्हाहोम

संभाव्य पूरस्थितीत नागरिकांना कोणताही धोका पोहोचणार नाही – आमदार अतुलबाबा भोसले  

कराड/प्रतिनिधी : –

कोयना धरणातून नदीपात्रात सुमारे एक लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने, कराडला संभाव्य पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची व्यवस्था केली आहे. प्रशासनाने शाळांनाही सुट्टी जाहीर केली असून, आरोग्य यंत्रनाही ॲक्शन मोडवर ठेवली आहे. त्यामुळे संभाव्य पूर परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज असून, नागरिकांना कोणताही धोका पोहोचणार नाही, याची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी संभाव्य पूर परिस्थितीसंदर्भात आमदार डॉ. अतुल भोसले यांनी प्रशासनाच्या सर्व विभागांची आढाव बैठक घेतली. बैठकीस प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत भटकर, मलकापूर पालिकेचे मुख्याधिकारी प्रताप कोळी, तसेच आरोग्य व महसूल विभागासह अन्य विभागाचे अधिकारी

उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार भोसले बोलत होते.

 

आमदार भोसले म्हणाले, कराडला पूर परिस्थितीचा धोका लक्षात घेऊन प्रशासनास आवश्यक त्या सूचना केले आहेत. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी काही सूचना माझ्याकडे मांडल्या होत्या, त्या अनुषंगानेही प्रशासनास सूचित करण्यात आले आहे. प्रशासनातील विविध विभागांनुसार काय समस्या आहेत आणि त्यावर काय उपाययोजना करणे गरजेचे आहे, याची माहिती घेतली आहे. त्या त्या ठिकाणी पूर परिस्थितीचा धोका अधिक आहे, त्या ठिकाणी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, पूरग्रस्त भागातील लोकांचे पुनर्वसन कोठे केले पाहिजे, पाणी पातळीत किती वाढ झाल्यावर तात्काळ स्थलांतर केले पाहिजे, याविषयी सखोल चर्चा करण्यात आली असून, कोणतीही जीवित हानी होणार नाही, यासंदर्भात काटेकोरपणे काळजी घेण्यात आले आहे.

तसेच पावसाच्या पाण्यापासून पसरणारी रोगराई रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आली असून, येथील सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात साठीच्या रोगाच्या रुग्णांसाठी विशेष बेड उपलब्ध करून देण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनास देण्यात आल्या आहेत. या रोगासंदर्भात आवश्यकता औषधांचा साठा वाढवण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून आवश्यक तेवढा पुरवठा केला जाईल. मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही तश्या प्रकारच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच पावसाने उघडीप दिल्यास पाणी पातळी लवकर कमी होईल. मात्र पाऊस वाढल्यास पाणी पातळीत वाढ झाल्यास काय उपाययोजना कराव्यात, या संदर्भात प्रशासनाने एक त्रिसूत्री तयार केली आहे. त्यानुसार पूरग्रस्त भागातील नागरिकांचे स्थलांतर, पुनर्वसन व रोगाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी खाजगी शाळांनीही करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच महसूल विभाग, पोलीस प्रशासन, नगरपालिका व अन्यसर्व विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा चांगला समन्वय झाला असून, कोणतीही संभाव्य परिस्थिती उद्भवल्यास कराडकर नागरिकांना कसलीही अडचणी येऊ देणार नाही, असा निर्धार प्रशासनाने केला असल्याचे आमदार भोसले स्पष्ट केले.

Related Articles