सातारा जिल्हाहोम

मत नोंदणी व नाव कमी प्रकरणाची कागदपत्रे दाखवा – गजानन आवळकर यांची मागणी 

कराड/प्रतिनिधी : –

लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदार यादीतून नाव कमी व नोंदणी प्रक्रियेतील घोळामुळे निर्माण झालेल्या गोंधळावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक गजानन आवळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “मी आणि माझ्या कुटुंबावर दोन ठिकाणी मतदान केल्याचा खोटा आरोप काहींनी केला आहे. प्रत्यक्षात मी लोकसभेला कराड येथे मतदान केले. विधानसभेला वाठार येथे नाव नोंदणी करून कराडमधील नाव कमी करण्यासाठी अर्ज केला. मात्र, ते कमी झालेले नाही. यासंदर्भातील सर्व कागदपत्रे प्रशासनाने उपलब्ध करून द्यावीत,” अशी मागणी त्यांनी केली.

गजानन आवळकर यांनी यासाठी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेस प्रदेश ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, माजी जि.प. सदस्य नामदेवराव पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. आवळकर म्हणाले, “लोकसभेला वाठार येथील नाव वगळण्यासाठी मी कोणताही अर्ज केला नव्हता. तरीही माझे नाव वाठारमधून वगळण्यात आले. मात्र, विधानसभेला कराडमधील नाव कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मी वाठारमध्ये नाव नोंदणी केली. तसेच कराडमधील नाव कमी करण्यासाठी अर्ज केला. परंतु, अद्याप कराडमधील नाव कमी झालेले नाही. यामुळे दुबार नोंदणीचा गैरसमज निर्माण झाला असून, मी, माझ्या पत्नीच्या आणि भावाच्या संदर्भात दोन ठिकाणी मतदान केल्याचे खोटे आरोप करण्यात आले आहेत.”

यासंदर्भात प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी, लोकसभेला दुबार नाव कमी करण्याचा अर्ज कोणी व कोठे भरला, किती तारखेला भरला, कोणत्या पोर्टलवरून भरला याची सर्व माहिती ऑनलाईन आहे. त्यासंदर्भातील माहिती आपणास देऊ शकतो. यावर श्री. आवळकर यांनी कमी झालेल्या मतदानाच्या कागदपत्रांचीही मागणी त्यांच्याकडे केली. यासंदर्भात प्रांताधिकारी यांनी नाव कमी करण्यासाठी कोणी अर्ज दिल्याशिवाय नाव कमी होत नसल्याचे सांगितले. याबाबत सर्व कागदपत्रे आपणास उपलब्ध करून देतो, असे सांगत त्यांनी आवळकर यांना आश्वस्त केले.

या प्रक्रियेवर बोलताना प्रांताधिकारी म्हेत्रे यांनी, “मतदार नोंदणी व नाव कमी करण्यासाठी सहा नंबरचा फॉर्म ऑनलाइन भरावा लागतो. त्यासोबत आधारसह इतर कागदपत्रे जोडली जातात. मात्र ती खरी आहेत की खोटी, हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नाही. त्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण कार्यरत आहे. तक्रारीनंतर खोटी कागदपत्रे जोडल्याचे पुरावे मिळाल्याचे संबंधित  प्राधिकरणाच्या निदर्शनास आल्यानंतर आम्हाला तसा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई होऊ शकते.”

यावेळी आंदोलनकर्ते गणेश पवार यांच्याकडून उपस्थित केलेल्या बोगस मतदानाच्या मुद्द्यावर भानुदास माळी यांनी प्रशासनाने गांभीर्याने चौकशी करण्याची मागणी केली. “निवडणूक प्रक्रियेत झालेल्या घोळाबाबत अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास उपोषण सुरूच राहील,” असा इशाराही पेअर यांनी दिल्याचे सांगितले. त्यावर प्रांताधिकारी यांनी, “दोन ठिकाणी मतदान झाले का? याचे पुरावे केवळ न्यायालयीन प्रक्रियेतूनच निश्चित होतील. त्यानंतरच गुन्हा दाखल होऊ शकतो,” असे स्पष्ट केले.

दरम्यान, वाळवा व शिराळा तालुक्यातील अनेक मतदारांची नावे कराड तालुक्यात दुबार नोंद झाल्याचे आवळकर यांनी नमूद केले. तर नामदेवराव पाटील यांनी, “वारुंजी जिल्हा परिषद गटात तब्बल अडीचशे दुबार नोंदी झाल्या आहेत. त्याचीही चौकशी करावी,” अशी मागणी केली.

Related Articles