दुबार मतदार नोंदणी केल्याप्रकरणी आवळकर कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करा – मोहनराव जाधव
कराड/प्रतिनिधी : –
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. कराड शहर, कापील, गोळेश्वर या भागांतील मतदार याद्यांमध्ये अनेकांची नावे दोन ठिकाणी नोंद झाल्याचे आढळले आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक गजानन आवळकर यांच्या नावासह त्यांच्या पत्नी व भावाची नावे देखील दोन ठिकाणी असल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणात संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मोहनराव जाधव यांनी केली.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेचे बोलत होते. यावेळी अभिजीत मोरे, माजी उपसरपंच पांडुरंग पाटील व माजी ग्राम पंचायत सदस्य माणिकराव पाटील उपस्थित होते.
मतदारसंघात आवळकर कुटुंबीयांची दुबार नोंदणी असल्याचे सांगत श्री. जाधव म्हणाले, वाठार येथील मतदान केंद्रावर 1359 क्रमांकावर गजानन शंकर आवळकर (वय 63), 1358 क्रमांकावर संगीता गजानन आवळकर (वय 56) व 717 क्रमांकावर जयप्रकाश शंकर आवळकर (वय 49) अशी नावे आढळून येतात. आश्चर्याची बाब म्हणजे याच मतदारसंघातील कराड शहरातील भाग क्रमांक 127 मध्ये देखील या तिन्ही मतदारांची नावे पुन्हा नमूद आहेत. ही दुबार नोंदणी बोगस मतदानाच्या उद्देशानेच करण्यात आली आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी वाठार येथे आवळकर यांना प्रत्यक्ष मतदान करताना पाहिले आहे,” असा दावा जाधव यांनी केला.
ते म्हणाले, मतदार यादीत नावे दुबार असूनही त्याविरोधात आक्षेप नोंदविल्यानंतर कार्यवाही का झाली नाही. त्या काळात आवळकर यांनी आपल्या पदाचा व तत्कालीन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या वरदहस्ताचा वापर करून ही बाब दडपली, असल्याचा आरोप करत नावे नोंदविताना आवळकर व त्यांच्या कुटुंबीयांनी बोगस आधारकार्ड किंवा खोटी कागदपत्रे सादर केली असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
“बोगस कागदपत्रे वापरून, खोटी माहिती देऊन दुबार नोंदणी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. त्याचप्रमाणे आवळकर यांच्या प्रभावामुळे आणखी किती जणांची अशी नावे दोन ठिकाणी नोंद झाली आहेत, याचाही तपास झाला पाहिजे,” अशी मागणीही श्री. जाधव यांनी केली.
तसेच “मतदार नोंदणी ही निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली होते. तरीही कराड दक्षिणेत इतकी मोठी त्रुटी झाली आहे. त्यामुळे केवळ संबंधित मतदारांवरच नव्हे; तर बीएलओ, निवडणूक कर्मचारी व निर्णय अधिकार्यांचीही जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही कारवाई व्हावी.”, अशी ही मागणी श्री. जाधव यांनी केली आहे.