सातारा जिल्हाहोम

कापीलमधील नऊ मतदारांची नावे वगळणार – प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे

कराड/प्रतिनिधी : –

कराड दक्षिण मतदारसंघातील कापिल येथे मतदान केलेल्या नऊ मतदारांच्या नावांबाबत आलेल्या तक्रारींची चौकशी करून ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी राहत नसल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. त्यामुळे या मतदारांची नावे मतदार याद्यांतून वगळण्याची कार्यवाही लवकरच केली जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.

येथील प्रशासकीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार कल्पना ढवळे, पुरवठा अधिकारी साहिला नायकवडे, सहाय्यक महसूल अधिकारी युवराज पाटील, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, सहाय्यक महसूल अधिकारी गोपाल वसू, शिवराज माळी उपस्थित होते.

प्रांताधिकारी म्हेत्रे म्हणाले, गणेश पवार यांनी अलीकडेच कापिल व गोळेश्वर येथे बोगस मतदान झाल्याचा आरोप करत माध्यमांसमोर पुरावे सादर केले होते. गावात रहिवास नसलेल्या 9 मतदारांनी मतदान केले असून, एका महिला मतदाराने कोल्हापूरच्या पत्त्यावरील आधारकार्डच्या आधारे कापिल येथे मतदान केले आहे. तसेच काही मतदारांची नावे कापिल व गोळेश्वर या दोन्ही गावांच्या मतदार याद्यांमध्ये आढळून आली आहेत. शिवाय गोळेश्वरमध्ये तब्बल 75 बोगस मतदार असल्याचाही दावाही त्यांनी केला आहे.

यासंदर्भात माध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना प्रांताधिकारी म्हेत्रे म्हणाले, मतदार नोंदणीची प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन आहे. संबंधित व्यक्तींनी नोंदणी करताना कोणती कागदपत्रे दिली, याची माहिती तक्रारींच्या अनुषंगाने घेतली जाईल, तसेच ज्यांनी बोगस मतदानाबाबत आरोप केले आहेत, त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असेही त्यांनी सुचवले.

दरम्यान, कापील व गोळेश्वर या दोन्ही गावच्या मतदार याद्यांमध्ये एकाच व्यक्तीचे नाव कसे आले? पत्ता नसताना किंवा दुसऱ्याच्या नावाचे वीजबिल देऊन मतदार नोंदणी कशी झाली? कोल्हापूरच्या पत्त्यावरून कापीलमध्ये मतदान कसे झाले? अशा प्रश्नांना प्रांताधिकारी म्हेत्रे यांनी स्पष्ट आणि समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.

ते म्हणाले, मतदार नोंदणी सुनावणीत तब्बल चार हजार हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी केवळ दहा हरकतींचा निपटारा झाला. उर्वरित हरकतींवर कार्यवाही करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles