सातारा जिल्हाहोम

‘सर्पांबरोबर सहअस्तित्व’ विषयावर यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालयात मार्गदर्शन

कराड/प्रतिनिधी : –

येथील यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालयात ‘सर्पांबरोबर सहअस्तित्व : विज्ञान, सुरक्षा आणि संवर्धन’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सापांविषयी समाजात असलेली भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठी, तसेच पर्यावरणातील त्यांच्या भूमिकेची जाणीव करून देण्यासाठी करण्यात आले होते.

कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून कर्नाटक वन विभागाचे मान्यताप्राप्त सर्प रेस्क्यूअर व प्रशिक्षक आनंद चिट्टी उपस्थित होते. त्यांनी मागील २२ वर्षांपासून २१,४८० सापांना जीवदान दिले असून, ९२८ हून अधिक सर्पविषयक व्याख्याने सादर केली आहेत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी विषारी व बिनविषारी सापांची ओळख, जैवविविधतेतील सापांचे स्थान, सर्पदंश टाळण्याचे उपाय व सर्प संवर्धनाचे महत्त्व विषद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस.बी. केंगार होते. त्यांनी सापांचे पर्यावरणीय महत्त्व, आपत्कालीन मदत प्रणाली, तसेच स्वयंसेवी संस्था व शासन यामधील समन्वयाची आवश्यकता अधोरेखित केली.

या कार्यक्रमाची प्रस्तावना प्राणीशास्त्र विभाहाचे डॉ. टी.ए. शेख, परिचय डॉ.आर.ए. जमदाडे, सूत्रसंचालन श्रीमती एस.एस. मोरे आणि श्रीमती के.सी. मुल्ला यांनी, तर श्रीमती पी.एस. शिंदे यांनी आभार मानले.

कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी सापांविषयी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले. श्री. चिट्टी यांनी सर्व प्रश्नांचे विज्ञानाधारित समाधान करत विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्पांविषयी वैज्ञानिक जाण आणि संवेदनशीलता निर्माण झाली, असे प्रतिपादन प्राचार्य केंगार यांनी सांगितले.

Related Articles